रेहान अहमदचे पदार्पणातच पाच बळी, इंग्लंडला विजयासाठी 55 धावांची गरज
वृत्तसंस्था/ कराची
यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील येथे सुरु असलेल्या तिसऱया आणि शेवटच्या कसोटीत सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर इंग्लंडचा संघ एकतर्फी मालिका विजयाच्या मार्गावर आहे. इंग्लंडला आता विजयासाठी केवळ 55 धावांची गरज असून मंगळवारी ते विजयाची औपचारिकता पूर्ण करतील. या मालिकेत पाकला इंग्लंडकडून व्हाईटवॉशला सामोरे जावे लागेल. इंग्लंडने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत.
या शेवटच्या कसोटीत पाकचा पहिला डाव 304 धावांवर समाप्त झाल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 354 धावा जमवित पाकवर 50 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर पाकचा दुसरा डाव 74.5 षटकात 216 धावात आटोपला. इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 167 धावांची गरज असताना इंग्लंडने दिवसअखेर दुसऱया डावात 2 बाद 112 धावांपर्यंत मजल मारली आहे.
पाकने बिनबाद 21 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली पण रेहान अहमदच्या फिरकीसमोर त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. पाकचे पहिले तीन फलंदाज 54 धावात तंबूत परतले होते. इंग्लंडच्या लीचने पाकच्या अब्दुला शफिक, शान मसुद आणि अझहर अली यांना बाद केले. शफिकने 54 चेंडूत 4 चौकारांसह 26, शान मसुदने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. अझहर अलीला खाते उघडता आले नाही. कर्णधार बाबर आझम आणि शकिल यांनी चौथ्या गडय़ासाठी 110 धावांची भागिदारी केली. बाबर आझमने 6 चौकारांसह 54 तर शकिलने 6 चौकारांसह 53 धावा जमविल्या. पाकची ही जोडी फुटल्यानंतर त्यांचे तळाचे फलंदाज रेहान अहमदने झटपट गुंडाळले. रेहान अहमदने बाबर आझम, शकिल, रिझवान, सलमान आणि मोहम्मद वासिम यांना बाद केले. सलमानने 1 चौकारासह 21 तर नौमन अलीने 2 चौकारांसह 40 धावा जमविल्या. पाकचा दुसरा डाव 74.5 षटकात 216 धावात आटोपला. इंग्लंडतर्फे रेहान अहमदने 48 धावात 5 तर लीचने 72 धावात 3, रुट आणि वूड यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

पाकच्या बाबर आझमने 2022 च्या क्रिकेट हंगामात 1 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. गेल्या 6 वर्षांच्या कालावधीत वर्षभराच्या कालावधीत 1 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा बाबर आझम हा पाकचा पहिला फलंदाज असून त्याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱया कसोटीतील सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवशी हा विक्रम केला. पाकच्या दुसऱया डावात 45 धावा जमविल्या असताना त्याने 1 हजार धावांचा टप्पा ओलांडला. या वर्षीच्या क्रिकेट हंगामात त्याने 8 कसोटीत 1009 धावा जमविल्या आहेत. आता इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर पाकचा संघ पुढील आठवडय़ात न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार रुटने 2022 च्या क्रिकेट हंगामात इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा जमविल्या आहेत. त्याने 15 कसोटीत 1098 धावा केल्या असून इंग्लंडच्या बेअरस्टोने 10 कसोटीत 1061 धावा जमविल्या आहेत. या वर्षीच्या क्रिकेट हंगामात आतापर्यंत या चार फलंदाजांनी हा टप्पा गाठला आहे. पाकचा माजी कसोटीवीर युनूस खानने यापूर्वी म्हणजे 2006 साली 1179 धावा तर 2014 साली 1064 धावा नोंदविण्याचा पराक्रम केला होता. पाकच्या मोहम्मद युसूफने 2006 साली 1788, इंझमाम ऊल हकने 2000 साली 1090, अझहर अलीने 2016 साली 1198 तर मोहसिम खानने 1982 साली 1029 धावा जमविल्या होत्या.
इंग्लंडने आपल्या दुसऱया डावाला दमदार सुरुवात केली. क्रॉले आणि डकेट या सलामीच्या जोडीने 11.3 षटकात 87 धावांची भागिदारी केली. पाकच्या अब्रार अहमदने क्रॉलेला पायचीत केले. त्याने 41 चेंडूत 7 चौकारांसह 41 धावा जमविल्या. तिसऱया दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी अब्रार अहमदने नाईट वॉचमन रेहान अहमदला 10 धावांवर त्रिफळाचीत केले. इंग्लंडने 17 षटकाअखेर 2 बाद 112 धावा जमविल्या. डकेट 8 चौकारांसह 50 तर कर्णधार स्टोक्स 1 चौकारासह 10 धावावर खेळत आहेत. पाकतर्फे अब्रार अहमदने 43 धावात 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक – पाक प. डाव ः सर्व बाद 304, इंग्लंड प. डाव ः सर्व बाद 354, पाक दु. डाव ः 74.5 षटकात सर्व बाद 216 (बाबर आझम 54, शकिल 53, शफिक 26, शान मसुद 24, सलमान 21, रेहान अहमद 5-48, लीच 3-72, रुट 1-31, वूड 1-25), इंग्लंड दु. डाव ः 17 षटकात 2 बाद 112 (डकेट खेळत आहे 50, क्रॉले 41, रेहान अहमद 10, स्टोक्स खेळत आहे 10, अब्रार अहमद 2-43).









