30 डिसेंबरला चित्रपट झळकणार
स्वतःच्या अभिनयाच्या बळावर लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री नयनतारा सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘कनेक्ट’वरून चर्चेत आली आहे. निर्मात्यांनी त्याच् या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित केला आहे. नयनताराच्या या चित्रपटाचा तमिळ ट्रेलर मागील आठवडय़ात प्रदर्शित करण्यात आला होता.
ट्रेलरमध्ये एक आनंदी कुटुंब महामारीमुळे विविध ठिकाणी अडकून पडल्याचे दिसून येते. नयनताराने साकारलेल्या महिलेच्या मुलीमध्ये वाईट शक्ती शिरल्याचे आणि लॉकडाउन असल्याने या स्थितीला एकटय़ानेच सामोरे जाण्याचा निर्णय घेत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.

ट्रेलरमध्ये नयनताराची व्यक्तिरेखा स्वतःच्या मुलीला एका आत्म्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात संघर्ष करताना दर्शविण्यात आली आहे. या चित्रपटात विनयने तिच्या पतीची भूमिका साकारली आहे. तर सत्यराज राज हे तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. अनुपम खेर हे यात एका पुजाऱयाची भूमिका साकारत आहेत.
राउडी पिक्चर्स अंतर्गत विग्नेश शिवनकडून निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन सरवननने केले आहे. काव्या रामकुमारची कथा लाभलेला हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नयनतारा लवकरच एटली यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा चित्रपट ‘जवान’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती शाहरुख खान आणि विजय सेतुपति यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.









