सेन्सेक्स निर्देशांकात 468 अंकांची वाढ ः अदानी पोर्टस् नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑटो, एफएमसीजी आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या जोरावर सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार सकारात्मक बंद होताना दिसला. यात अदानी पोर्ट्स, आयशर मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग वधारत बंद झाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स 468 अंकांनी वधारत 61806.19 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 151 अंकांच्या तेजीसह 18420.50 अंकांवर बंद झाला. अदानी पोर्ट्स, आयशर मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प व अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग तेजीत होते. गेली दोन सत्रे शेअरबाजार घसरणीत होता. सोमवारी मात्र सर्वच क्षेत्रात खरेदी पाहायला मिळाली. टीसीएस, ओएनजीसी, इन्फोसिस, सन फार्मा आणि टाटा मोटर्सचे समभाग मात्र घसरणीत होते.
भारतीय शेअरबाजार सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी तेजीसह कार्यरत होता. माहिती तंत्रज्ञान कंपन्या, त्याचप्रमाणे फार्मा व बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांनी सोमवारी मजबूत कामगिरी दर्शविल्याने शेअरबाजाराला सकारात्मक वाटचाल करता आली. दिवसभराच्या सत्रामध्ये एकावेळी राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 60 अंकाच्या वाढीसह 18350 अंकांवर तर मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांनी वधारत 61530 अंकावर व्यवहार करत होता. निफ्टीतील स्मॉल कॅप निर्देशांक 0.3 टक्के तर मिडकॅप निर्देशांक 0.04 टक्के वधारलेला दिसला. निफ्टी आयटी निर्देशांक मात्र घसरणीत होता. सार्वजनिक बँकांचा निर्देशांक देखील घसरणीमध्ये राहिलेला दिसून आला. बाजारात साखर कंपन्यांचे समभाग मात्र 20 टक्क्यांपर्यंत वधारताना दिसले.
जागतिक बाजारात निरुत्साह
दुसरीकडे जागतिक बाजारामध्ये मात्र नकारात्मक वातावरण असल्याचे पहायला मिळाले. अमेरिकेतील बाजार घसरणीसह कार्यरत होते. यामध्ये डोव्ह जोन्स निर्देशांक 251 अंकांनी तर नॅसडॅक निर्देशांक 105 अंकांनी घसरलेला दिसला. युरोपियन बाजारात मात्र काहीशी तेजी पहायला मिळाली. आशियाई बाजारांचा विचार करता बराचसा नकारात्मक कल दिसत होता. यामध्ये निक्की निर्देशांक 289 अंकांनी, हँगसेंग 97 अंक, कोस्पी 7 अंक आणि शांघाई कंपोझिट निर्देशांक 60 अंकांनी घसरणीत होता. नायका कंपनीचे समभाग सोमवारी शेअरबाजारात नीच्चांकी स्तरावर पोहाचल्याचे दिसून आले. सोमवारी 3 टक्के घसरणीसह नायकाचा समभाग 161 रुपयांवर घसरला होता. या आधी या कंपनीचा समभाग 28 ऑक्टोबर 2022 रोजी 162 रुपयांवर नीच्चांकी स्तरावर कार्यरत होता.









