13 ते 18 जानेवारीला नोएडात आयोजन ः 30 हून अधिक कंपन्यांचा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दर तीन वर्षानी भरणारे पंधरावे ऑटो एक्स्पो प्रदर्शन पुढील वर्षी 13 ते 18 जानेवारी या कालावधीत नोयडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये 30 हून अधिक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश राहणार असल्याचेही सांगितले जात आहे.
सदरच्या प्रदर्शनामध्ये भारतातील दिग्गज कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी, हय़ुंडाई मोटर्स, टाटा मोटर्स, किया इंडिया, एमजी मोटर इंडिया, टोयोटा, बीवायडी इंडिया यासह स्टार्टअप कंपन्यांचाही सहभाग असणार आहे. व्यावसायिक वाहने बनविणाऱया अशोक लेलँड, आयशर, जीबीएम, ईसुझु यासारख्या कंपन्यांचादेखील प्रदर्शनात सहभाग असणार आहे. त्याचप्रमाणे लिथियम आयर्न बॅटरी, चार्जर आणि इतर इलेक्ट्रीक वाहनांच्या सुटय़ा भागांची निर्मिती करणाऱया तसेच टायर उत्पादक कंपन्यांचाही सहभाग प्रदर्शनात असणार आहे.
इलेक्ट्रीक कंपन्यांचा सहभाग
ओकिनावा ऑटोटेक, ग्रीव्ज, कॉटन, हिरो इकोटेक, टार्क मोटर्स, वार्ड व्हिझार्ड इनोव्हेशन आणि इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रीक गाडय़ा प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सुमारे 30 हून अधिक कंपन्या आपली उत्पादने प्रदर्शनात ठेवणार आहेत.
या कंपन्या नसतील
या प्रदर्शनात महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, फोक्सव्हॅगन, रेनॉ आणि निस्सान सारख्या कंपन्या मात्र प्रदर्शनात सहभाग घेणार नाहीत. लक्झरी कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यू, मर्सिडीज व ऑडी यांचाही या प्रदर्शनात सहभाग नसेल.









