नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मुंबईतील श्रद्धा वालकर या युवतीची दिल्लीत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाची चर्चा असतानाच राजस्थानची राजधानी जयपूर येथेही अशाच प्रकारचे हत्याकांड झाल्याचे दिसून आले आहे. आरोपीचे नाव अनुज शर्मा असे असून त्याने आपल्या काकीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. शर्मा याने आपल्या काकीचा डोक्यात हातोडा मारुन खून केला. त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. मृत काकीचे नाव सरोज शर्मा असे आहे. तिच्या पतीच्या निधनानंतर ती अनुज शर्मा याच्यासह रहात होती. अनुज शर्मा याच्या पत्नीचेही निधन झाले आहे. त्याच्या आईचेही गेल्या वर्षीच निधन झाले होते, अशी माहिती देण्यात आली. या प्रकरणी जयपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.









