प्रतिनिधी/ बेळगाव
कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपण आयुष्यभर त्याच क्षेत्राचा अभ्यास सातत्याने करत राहावा, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू यांनी केले. येथील लोकमान्य सोसायटीला त्यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी स्वागत केले व लोकमान्य संस्थेची माहिती दिली. अध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने निवृत्त लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू यांचा शाल, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना ले. पन्नू यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. आपण सातत्याने वाचन करावे व आपल्या ज्ञानात वेळच्यावेळी भर घालावी, कारण आजचे युग हे शैक्षणिक युग म्हणून ओळखले जाते. या युगात जो शिकेल तोच टिकेल. संगणकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. गुरुंस्थानी पोचलात तरी आपल्यातला विद्यार्थी जपून ठेवावा, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक प्रभाकर पाटकर, सीईओ अभिजित दिक्षित, निवृत्त कर्नल दीपक गुऊंग, समन्वयक विनायक जाधव व लोकमान्य परिवारातील सदस्य उपस्थित होते.









