प्रतिनिधी/ बेळगाव
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या कथाकथन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. 22 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाच्या कथाकथन सत्रासाठी 15 डिसेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन येथे कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. याचे उद्घाटन अध्यक्ष जयंत नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. संजीवनी खंडागळे, प्रा. सुगंधा जठार, बसवंत शहापूरकर व निला आपटे उपस्थित होत्या.
प्राथमिक व माध्यमिक गटातील एकूण 35 स्पर्धकांमधून पाच विद्यार्थ्यांची कथाकथनासाठी निवड करण्यात आली. यामध्ये समृद्धी सांबरेकर, मनाली बराटे, कुशल गोरल, समृद्धी पाटील व मधुरा मुरकुटे यांचा सहभाग आहे. स्पर्धेसाठी प्रबोधिनीचे सदस्य धिरचसिंह रजपूत, इंद्रजित मोरे, गजानन सावंत, सीमा कंग्राळकर, रेणू सुळकर, स्वाती जाधव, भारती हानगोजी, अश्विनी हलगेकर यांनी परिश्रम घेतले. प्रसाद सावंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









