पूर्वसूचना न देताचा वाहतूक वळविल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा
प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खानापूर रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याकरिता ठिकठिकाणी खोदाई करून पाईप घालण्यात येत आहे. मात्र याबाबतची पूर्वसूचना देण्यात आली नाही. तसेच या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली नसल्याने संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परिणामी असंख्य वाहने अडकून पडण्याचे प्रकार सातत्याने निर्माण होत आहेत.
विकासकामे राबविताना सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही. याची दखल घेणे आवश्यक आहे. पण कामे मंजूर झालेल्या कंत्राटदारांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांसह व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे. बसवेश्वर चौक ते तिसऱ्या रेल्वेफाटकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले आहे. पण सदर काम नियोजनबद्ध नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
खानापूर रोडवर ठिकठिकाणी जलवाहिन्या आणि क्रॉसिंगपाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता ठिकठिकाणी खोदाई करण्यात येत आहे. रस्त्यावर पाईप घालण्यासाठी खोदाई करताना बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांची कोंडी निर्माण होऊन रस्त्यावर रांगा लागत आहेत. गुरुवारी या ठिकाणी रस्त्यावर खोदाई करण्यात आल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने बसवेश्वर चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नियोजित वेळेत पोहोचण्यास नागरिकांना विलंब होत आहे.
विकासकामे राबविताना वाहतूक वळविण्याची आवश्यकता आहे. किंवा याबाबत पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. कंत्राटदाराच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे शहरवासियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामे सुरू करण्यापूर्वी वाहतूक वळविल्यास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही. तसेच पूर्वसूचना दिल्यास वाहनधारक अन्य मार्गाने जावू शकतात. पण प्रशासनाच्या आणि कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
नेहरुनगर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या
एपीएमसी रोडचे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी आझमनगर क्रॉस ते एपीएमसी क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना या रस्त्यावर नेहरुनगर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला.









