प्रतिनिधी / मुंबई
सीमाभागाच्या दौऱयाला कर्नाटक सरकारकडून मज्जाव करण्यात आलेल्या दोन मंत्र्यांपैकी शंभूराज देसाई आज शुक्रवारी सीमाभागाचा दौरा करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर आता सीमावादावर पडदा पडणार असल्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. ते सीमाभागाच्या दौऱयावर असल्याने मराठी भाषिकांमध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा पेटला होता. कर्नाटकाने महाराष्ट्रातच्या हद्दीतील जत तालुक्यातील काही गावांवरही दावा सांगितला. त्यामुळे सीमावाद पुन्हा पेटला. कर्नाटकातील संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केली. काही वाहने अडवून प्रवाशांचा छळही केला. त्यावरही कढी म्हणजे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी समन्वयक मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले होते. विरोधकांकडून सत्ताधाऱयांवर शरसंधान करण्यात येत होते. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पेंद्रीय गफहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर या वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शंभूराज देसाई यांचा सीमाभागाचा दौरा हा त्याचा प्रारंभ आहे, असे मानण्यात येत आहे. शंभूराज देसाई सीमाभागाच्या दौऱयावर असल्याने मराठी भाषिकांमध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचातींच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेते विविध भागांचा दौरा करत आहेत. त्याच धर्तीवर आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी समन्वयक मंत्री शंभूराज देसाई सीमाभागाचा दौरा करणार आहेत. सीमाभागातील शिनोळी गावामध्ये शंभूराज देसाई यांची सभा होणार आहे. ते गडहिंग्लजचाही दौरा करणार आहेत. शंभूराज देसाई सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्नही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीतच मंत्री शंभूराज देसाई यांनी सीमाभागातील दौरा काढला असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका असणाऱया गावांचे लक्षही या दौऱयाकडे लागून राहिले आहे.









