थंडीच्या दिवसात उबदार राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होणे गरजेचे असते. या काळातदेखिल आपल्या शरीराची विषाणू आणि बॅक्टेरियाशी लढण्याची कार्यक्षम कमी होते ज्यामुळेच आपल्याला फ्लू, कोविड-19 किंवा घशाच्या संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपल्या शरीराला योग्य ती पोषक तत्वे मिळणे महत्वाचे आहे जेणेकरून आपण हिवाळ्यातील आजारांपासून संरक्षण करू.
हिवाळा येताना अनेक विषाणू, संक्रमण आणि ऍलर्जी देखील घेऊन येतो. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या अन्न घटकांचा आहारात अधिक समावेश करणे गरजेचे आहे. या आहारामुळे आपल्या शरिरात पांढऱ्या रक्तपेशींची वाढ होऊन विविध आजारांशी लढण्यासाठी शरीरात अधिक प्रतिजैविके तयार होतात. ज्यामुळे आपल्याला निरोगी आणि उबदारपणा जाणवतो.
आपल्या जिवनशैलीचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असतो. रोजचा आहारातील सवयी, शारीरिक हालचाल, झोपेचा अभाव आणि तणावपूर्ण जिवनशैली यांमुळे हवामानातील बदलांदरम्यान आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. काही औषधी वनस्पती आणि मसाले, लिंबूवर्गीय फळे आणि प्रथिनेयुक्त पदार्थ यांचे सेवन थंडीच्या हवामानात अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते.
काळी मिरी
काळी मिरी हा हिवाळ्यात सर्वात उपयुक्त मसाला असून त्याचे आरोग्यविषयक अनेक फायदे आहेत. त्यामुळेच याला “काळे सोने” असेही म्हटले जाते. काळी मिरी केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर मानवी शरीरात उष्णताही वाढवते. यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी सुधारून रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. काळी मिरी या तिखट मसाल्यामध्ये अनेक संयुगे असतात. त्यापैकी पाइपरिन हे संयुग केवळ पेशींचे संरक्षणच करत नाही तर पाचक शक्तीला देखील चालना देते.

तीळ
पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे तीळ हे आपली प्रकृती गरम आणि उबदार ठेवते. यामधील मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडसमवेत अँटी-बॅक्टेरियल खनिजामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. यातील सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडेंट कर्करोगाशी (Cancer) लढण्याची शक्ती देते असे संशोधनातून समोर आले आहे. तसेच मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते. मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम, लोह आणि सेलेनियम हृदय तंदरूस्त ठेवते. त्याच बरोबर तीळाचे तेल तोंडाच्या अल्सरवर प्रभावी औषध असून ते त्वचेला देखील फायदेशीर ठरते.

गूळ
गूळ हा शरीरासाठी खूपच असून बरेच लोक आजही आपल्या आहारात गूळाचा किंवा त्यापासून केलेल्या पदार्थाचा वापर करतात. जगात एकूण खाल्ल्या जाणार्या गुळापैकी ७०% गुळाचे उत्पादन भारतातच होते. यामुळे आपली चयापचय (Metabolism) क्रिया सुधारते. गूळातील सुक्रोज आणि फायबर मुळे आपण फ्रेश आणि तरतरित राहतो. गूळातील लोहामुळे (Iron) अशक्तपणा (Anemia) दूर होऊन रुग्णांना त्याचा फायदा होतो. याच्या नियमित सेवनामुळे सर्दी किंवा थंडी वाजणे असे प्रकार थांबतात. यामधील मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडेंट(Anti-oxidants) रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) मजबूत करतात.

गवती चहा
लेमनग्रास ही एक गवतवर्गीय वनस्पती असून ती सामान्यत: वेदना आणि उबळ दूर करण्यासाठी अरोमाथेरपीमध्ये वापरली जाते. याची हर्बल घटकांमुळे आहारात अँटिऑक्सिडंट्सचा पुरवठा होतो. खोकला किंवा घसा खवखवणे यावर रामबाण मानले जाते. तसेच याच्या सेवनाने शरिरातील ताप नियंत्रणात ठेवतो. शरिरातील बॅक्टेरिया आणि यीस्टीची वाढ यामुळे रोखली जाऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आले आणि लसूण
पारंपारिक मसल्यामध्ये सगळ्यात जास्त उपयोगात आणले जाणारे हे मसाले आहेत. यांच्या मिश्रणामुळे केवळ जेवणाची चवच वाढत नाही तर त्यांच्या अति-दाहक आणि अँटीऑक्सीडेट या गुणधर्मांमुळे आतड्यांचे आरोग्य देखील सुधारते. हिवाळ्याच्या हंगामात अनेक विषाणू आणि जीवाणू सक्रिय होत असल्याने, आले- लसणाचे अँटीव्हायरल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात.

लिंबूवर्गीय फळे
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लिंबूवर्गीय फळे एक चांगला पर्याय आहे. कारण व्हिटॅमिन- सी, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि एन्झाईम्सने भरपूर असतात. संक्रमणाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्याचे अत्यंत महत्वपुर्ण काम या फळाद्वारे केले जाते. आतड्यांच्या आरोग्यात यांच्या सेवनाने कमालीचा सुधार येतो. लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने त्वचेचा कोरडा आणि खवले असलेला पोत सुधारून त्वचा अधिक पोषक आणि नितळ बनते.










