नवी दिल्ली ः
सोनेदराने 9 महिन्यांची उंची गाठल्यानंतर ते पुन्हा स्वस्त झाले आहे. दरवाढीमुळे मागणी कमी झाल्याचा परिणाम सोनेदरावर दिसून येत आहे. राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याचा भाव 406 रुपयांनी घसरून 54,268 रुपये प्रतितोळा झाला आहे. तसेच व्यापाऱयांनी कमी केलेल्या ऑर्डरमुळे गुरुवारी चांदीचा भाव 1,385 रुपयांनी घसरून 67,917 रुपये प्रतिकिलो झाला. जागतिक पातळीवर अन्य देशांमध्येही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झालेली दिसत आहे.
सोन्याचा भाव बुधवारी 54,460 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर गेला होता. गेल्या 28 महिन्यातील हा उच्चांकी भाव होता. यापूर्वी 10 ऑगस्ट 2020 रोजी सोने 55,515 रुपये होते. दुसऱयाच दिवशी 11 ऑगस्टला तो 53,951 रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच सोन्याचा भाव 54,000 रुपयांच्या वर गेला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने आपला सार्वकालिक उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रतितोळा इतका होता.









