ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
लंडन / वृत्तसंस्था
भारतीय बँकांना 14 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालून देशातून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता आणखी सुकर झाला आहे. त्याची प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी त्याचे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय घेतल्यास तो भारताच्या हाती लागणे शक्य आहे.
काही काळापूर्वी लंडनच्या उच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात त्याने तेथील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे त्याचे प्रत्यार्पण आता भारताला केले जाऊ शकते.
उच्च न्यायालयाकडूनच प्रतिबंध
तेथील उच्च न्यायालयाने त्याची प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका फेटाळताना त्याचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्गही बंद झाला असल्याचा आदेश दिला होता. तथापि, तो आदेश न पटल्यामुळे त्याने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा खटखटला होता. मात्र, तेथेही त्याच्या पदरी अपयशच पडले आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही आदेशात कोणतीही सुधारणा करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करुन सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.
आता ब्रिटन सरकारचा निर्णय महत्त्वाचा
सर्वोच्च न्यायालयात जरी नीरव मोदीच्या विरोधात निर्णय गेलेला असला, तरी प्रत्यार्पणाचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार नियमाप्रमाणे तेथील केंद्रीय गृहमंत्र्यांना आहेत. त्यांनी त्यांचा उपयोग भारताच्या बाजूने केल्यास त्वरित त्याचे प्रत्यार्पण भारताला होऊ शकते. आता केंद्र सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
कायद्याचा मार्ग आता बंद
नीरव मोदी याचे प्रत्यार्पण हे तेथील प्रशासनाच्या हाती असल्याने ते नेमके कधी होईल हे सांगता येत नाही. तेथील सरकारच्या हाती आता नीरव मोदीचे भवितव्य आहे. मात्र, त्याचा न्यायालयाकडून दिलासा मागण्याचा मार्ग बंद झाला आहे. आता केवळ प्रशासकीय मार्ग त्याच्या हाती उरला आहे. त्यामुळे आता त्याच्या प्रत्यार्पणात केवळ एक बाब पूर्ण होणे बाकी राहिले आहे. येत्या दोन-चार दिवसांत यासंबंधीचा निर्णय होऊही शकतो. पण नीरव मोदीचे भवितव्य कोणती दिशा पकडणार, हे आता तेथील सरकारचे गृहमंत्रीच ठरविणार आहेत.
काय आहे प्रकरण ?
हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँक व इतर काही बँकांकडून मोठय़ा प्रमाणावर कर्ज घेतले आहे. हे कर्ज आज व्याजासकट जवळपास 12 हजार कोटी रुपयांचे आहे. त्याने हा पैसा हिऱयांच्या व्यापारासाठी घेतल्याचे दाखविले होते. तथापि, त्यातील बराचसा पैसा भारताबाहेर पाठविण्यात आला होता. 2018 मध्ये हे प्रकरण बाहेर पडले होते. त्यापूर्वीच त्याने भारताबाहेर पलायन केले होते. तेव्हापासून तो ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यानेही अशाच प्रकारे कर्ज घेऊन भारताबाहेर पलायन केले आहे. त्याच्याही प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत. चोक्सी यानेही घेतलेल्या कर्जाची रक्कमही आज 3 हजार कोटी रुपयांच्या वर आहे. या दोघांचीही भारतातील मालमत्ता जप्त करून 60 टक्के थकित कर्जाची भरपाई करून घेण्यात आली आहे. या दोघांनीही भारताबाहेर विकत घेतलेल्या मालमत्तांवरही टाच आणण्यात आली आहे. तथापि, त्याच्यावर गुन्हेगारी स्वरुपाचा अभियोग चालविण्यासाठी आणि अद्याप न फेडलेले कर्ज फेडून घेण्यासाठी त्याच्या प्रत्यार्पणाची भारताला आवश्यकता आहे.
प्रत्यार्पणाची शक्यता बळावली
ड नीरव मोदीचे सर्व कायदेशीर मार्ग तेथील न्यायालयाने केले बंद
ड नीरव मोदीचे ब्रिटनमध्ये वास्तव्य, भवितव्य तेथील सरकारच्या हाती
ड भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटिश सरकारकडे जाणार









