अध्याय चोविसावा
सांख्य शास्त्रावर आधारित प्रकृती पुरुषाचे निरूपण भगवंत उद्धवाला समजाऊन देत आहेत. ते म्हणाले, सुरवातीला ब्रह्म एकटेच होते नंतर त्याच्यात मी ब्रह्म आहे असे स्फुरण झाले आणि त्यातून प्रकृती, पुरुषाची निर्मिती झाली व त्यातून सकल सृष्टीची निर्मिती झाली. म्हणून हे लक्षात घे की, ब्रह्म अखंड आहे पण मायेने त्याचे प्रकृती आणि पुरुष असे दोन भाग केले आहेत. त्यातील पुरुष हा माझाच अंश असतो पण त्याला प्रकृतीच्या त्रिगुणांनी वेढलेले असते. तो त्या गुणांच्या प्रभावाखाली असल्याने त्याला माझा विसर पडून तो संसारात गुंग होऊन प्रकृतीच्या तालावर नाचत असतो. आधी तो सोहं म्हणजे तो मीच आहे अशा विचाराचा असतो. त्यामुळे त्याला स्वतःच्या स्वरूपाचे स्मरण असते पण नंतर त्रिगुणांच्या प्रभावात अडकल्याने त्याला स्वरूपाकडे सन्मुख व्हावे असे वाटतच नाही. त्याऐवजी तो अगदी उलट बाजूलाच म्हणजे संसाराकडे पाहात बसतो. खरं तर प्रकृती आणि पुरुष म्हणजे जीवात्मा हे दोन्ही मायेचाच भाग असल्याने नष्ट होणारे आहेत. जिवात्म्याला तो पुरुषही नाही आणि प्रकृतीही नाही हे उमगले की, त्रिगुणांचा प्रभाव नष्ट होतो आणि स्वस्वरूप प्रगट होते.
साधकाला झालेल्या आत्मज्ञानामुळे आपले मूळ स्वरूप हे वेगळे असून आपण ब्रह्माचा अंश आहोत हे त्याच्या लक्षात येते. सुरवातीला म्हणजे सत्य युगात माणसे वेदाने सांगितल्याप्रमाणे सरळ वागत होती. फक्त पुण्यकर्मे निरपेक्षतेने करत होती पण पुढे जसजसा माणसाचा स्वार्थ वाढत गेला तसतशी माणसे गैरकृत्ये करू लागली. स्वार्थ साधण्यासाठी काहीएक अपेक्षेने पुण्यकृत्ये करू लागली. त्यामुळे त्यांच्या शुभाशुभ कर्मानुसार त्यांचे प्रारब्ध ठरू लागले. त्यासाठी मीच प्रकृतीला प्रक्षुब्ध केल्यावर तिच्यापासून सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण प्रगट झाले. प्रकृती ही पूर्णपणे गुणमयी आहे. तिला पुरुषदृष्टी प्राप्त झाली म्हणजे ती तिन्ही गुण प्रगट करते. ते तीन गुण भिन्न भिन्न आहेत, पण ते भिन्नपणातही सारखेच वाढत असतात. त्यालाच सूत्र, प्रधान आणि क्रियाशक्ती अशी नावे आहेत. क्रियाशक्तीत जडपणा असतो. तेथे जे चेतनात्मक ज्ञान उत्पन्न होते, त्याचेच नाव महतत्त्व होय. क्रियायुक्त जे ज्ञान स्फुरण पावते, तेथेच अभिमान जागृत होतो आणि तीन गुणांनी पूर्ण अहंकार त्या ठिकाणी उत्पन्न होतो.
अहंभाव भयंकर खवळला, की तो शिवाला शिवपणाचा विसर पाडतो. मी म्हणजेच हा देह या विचाराने पूर्णपणे भ्रमलेल्या आत्म्याला जन्ममरण भोगावयास लावतो. उद्धवा, अहंकारापासून विकार कसे उत्पन्न होतात ते सांगतो. अहंकार हा अत्यंत दुर्धर आहे. त्याचे सत्त्वादी गुणानुसार तीन प्रकार होतात. गुण व अहंता हाच मोठा संसार होय. गुणांचा विकार असा आहे की, प्रथमतः सात्विक अहंकार उत्पन्न होत असून तो अंतःकरणाला प्रकाशित करतो. तोच अनेक देवतांमध्ये विकार उत्पन्न करणारा आहे, म्हणून त्याला ‘वैकारिक’ म्हणतात. जो राजस अहंकार असतो, तो ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा प्रकाशक असतो. राजस तेजाचे विलास त्याला आवडतात, म्हणून त्याला तैजस असे म्हणतात. तामस अहंकाराचा परिणाम असा होतो की, तो सूक्ष्म परमाणुरूप भूतांना उत्पन्न करतो. म्हणून त्याला ‘भूतादि’ असे म्हणतात.
अहंकाराची ताकद मोठी विलक्षण असते. ती सचेतनाला अचेतन बनवते आणि ज्ञान-अज्ञानांची पक्की गाठ मारून मोठय़ा प्रेमाने स्वतःचे लग्न तिच्याशी लावतो. जीव हा ज्ञानस्वरूप आहे, त्याचे जड देहाशी लग्न होते आणि देह त्याला जड, मूढ व वेडा करून सोडतो. त्याला हाडांच्या खोडय़ात जखडून टाकतो. तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि त्यांपासून पंच महाभूते उत्पन्न झाली. राजस अहंकारापासून इंद्रिये आणि सात्त्विक अहंकारापासून इंद्रियांच्या अधि÷ात्या अकरा देवता प्रगट झाल्या. विषय तीच महाभूते होत. तामसगुणाने ती पाच महाभूते परस्परांशी मिश्रण न करिता वेगवेगळी निर्माण केली आहेत. ती पंचमहाभूते विषयापासून उत्पन्न होतात.
क्रमशाः








