पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी/ बेळगाव
हुक्केरी ग्रामीण वीज संघाच्या ट्रान्स्फॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या पाच आरोपिंना पहिले अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. विश्वनाथ वीराप्पा हुदली, गजानन सिद्दाप्पा अलकनूर, काशिनाथ ईरेशी गीडमनी, इराप्पा लगमा हुगाई सर्व राहणार बुगडीकट्टी ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, आणि भिमाप्पा कल्लाप्पा नाईक रा. चिंचेवाडी ता. गडहिंग्लज अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
या सर्वांनी हुक्केरी, संकेश्वर, यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीमधील वीज ट्रान्स्फॉर्मरमधील ऑईल नष्ट करून तांब्याच्या तारा चोरल्या होत्या. एकूण 51 घटना घडल्या. 2014 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी त्याचा शोध लावला आणि या सर्वांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्यात आले होते. यामध्ये या सर्व आरोपिंनी चोरी केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे न्यायालयाने चार आरोपींना 2 वर्षे 4 महिने 11 दिवस तर आरोपी भिमाप्पा नाईक याला 1 वर्ष 2 महिने अशी शिक्षा सुनावली आहे.









