‘यंग सायंटिस्ट’ पुरस्कार देणार : मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात मुख्यमंत्र्यांची घोषणा
प्रतिनिधी / पणजी
प्रगत वैज्ञानिक साधने आणि तंत्रज्ञान वापरून दर्जेदार शिक्षणावर माझे सरकार भर देत आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी नामवंत शास्त्रज्ञ बनावे आणि जगभरातील प्रगतीत योगदान द्यावे, हा त्यामागील उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी पुढील वर्षापासून ’यंग सायंटिस्ट’ पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना समर्पित असेल, असे ते पुढे म्हणाले.
स्व. पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान व तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खात्यातर्फे मंगळवारी दोनापावल येथे आयोजित चौथ्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. मनोहर पर्रीकर यांच्या नावाने राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार आहे. हा पुरस्कार 35 वर्षांखालील तऊण शास्त्रज्ञाला दिला जाईल व विज्ञान महोत्सवाच्या पुढील आवृत्तीपासून दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले. हा कार्यक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचा प्रमुख कार्यक्रम होण्याच्या मार्गावर असल्याचे ऐकून आनंद झाला, असे ते पुढे म्हणाले.
सहा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
दरम्यान, या महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 17 शास्त्रज्ञ गोव्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दोना पावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय, फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर, केपे व पेडणे येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालय, कोणकोण येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळा, सांखळीतील रवींद्र भवन आणि झुआरीनगर येथील बिटस् पिलानी आदी ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमादरम्यान डीआरडीओ एरोनॉटिकल सिस्टीम्सच्या महासंचालक तथा भारताच्या क्षेपणास्त्र महिला अशी ओळख असलेल्या डॉ. टेसी थॉमस, यांचे ’अॅडव्हान्सेस इन एरोस्पेस टेक्नॉलॉजीस’ या विषयावर व्याख्यान होईल. त्याचा राज्यातील सुमारे सहा हजार विद्यार्थी वरील सर्व ठिकाणी उपस्थिती लावून लाभ घेणार आहेत.
कोइंब्रा विद्यापीठातील पोर्तुगालस्थित प्रोफेसर ख्रिस्तोफर ब्र्रेट यांचे ’रासायनिक घटकांचे विलक्षण जग’ या विषयावर व्याख्यान होईल. तसेच गूगल चे अमेरिकेतील सॉफ्टवेअर अभियांत्रिकी व्यवस्थापक, मूळ गोमंतकीय अँड्रिया कोलाको यांचे ’विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अलीकडील प्रगती’ या विषयावर आभासी व्याख्यान होणार आहे.









