प्रतिनिधी / पणजी
चौकशीची मागणी करणारी याचिका मागे घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आमदार संकल्प आमोणकर यांना नकार दिला असून त्यांची मागणी फेटाळून लावताना त्यांना ‘खडे बोल’ सुनावले. तसेच त्यांची कडक शब्दात खरडपट्टी काढली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद नाईक यांचे ‘सेक्स स्कँडल’ आणि आपल्यावर होणारे खंडणी व ब्लॅकमेलचे आरोप केल्याप्रकरणी आमदार आमोणकरांनी याचिका सादर केली होती. निवडून आल्यावर ते भाजपवासी झाले आणि आता सदर याचिका मागे घेऊ पाहतात. म्हणून खंडपीठाने त्यांना कडक शब्दांत समज दिली.
माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्या ‘सेक्स स्कँडल’ प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच आपण खंडणी मागून ब्लॅकमेल करतो, असे आरोप केले जातात. याबाबत तपास करण्याची मागणी आमोणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या एका याचिकेतून केली होती.
राजकीय स्वार्थासाठी न्यायालयाचा गैरवापर करू नये
राजकीय परिस्थितीनुसार याचिका सादर करायला किंवा मागे घ्यायला मिळत नाही. बाजू वरचढ झाली म्हणून याचिका मागे घेता येत नाही. राजकीय स्वार्थासाठी न्यायालय किंवा कायदा नियमांचा गैरवापर करता येणार नाही, असे सांगून न्यायालयाने याचिका फेटाळली आणि आमोणकरांना कानपिचक्या दिल्या आहेत. पुढील सुनावणी 9 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.









