प्रतिनिधी / बेळगाव
नेहरूनगर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलातील 30 गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. मात्र या गाळ्यांचे काम अपूर्ण असल्याने या लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नाही. सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या लिलावप्रसंगी 43 पैकी 11 गाळ्यांना बोली लागली.
नेहरूनगर येथील व्यापारी संकुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. मात्र हे काम पूर्ण होण्यापूर्वीच येथील तळघरात पार्किंग तळ निर्माण करण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. तसेच गाळेदेखील भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी या संकुलातील 23 गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी बोली लावण्यात आली होती. मात्र हे काम अपूर्ण असल्याने गाळ्यांचा ताबा भाडेकरूंना देण्यात आला नाही. त्यामुळे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रसंगी प्रतिसाद लाभला नाही.
कणबर्गी तलावाशेजारील गाळे, महांतेशनगर येथील गाळे आणि नेहरूनगर व्यापारी संकुलातील गाळ्यांसह 43 गाळ्यांकरिता लिलाव आयोजित करण्यात आला होता. यावेळी केवळ 11 गाळ्यांना बोली लागली. तसेच बोलीवेळी स्पर्धा झाली नसल्याने महापालिकेने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा केवळ 200 ते 300 रुपये वाढ करून बोली लावण्यात आली. हे काम अर्धवट असल्याने गाळे घेण्याकडे व्यावसायिकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.









