लांजा प्रतिनिधी
तालुक्यातील आरगाव गावचे ग्रामदैवत केदारलिंग आणि देवमळा येथील गांगेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरटय़ांनी 3 हजार 500 रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 ते 11 डिसेंबर रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबतची फिर्याद संदेश वामन खामकर (45, आरगाव, खालीलवाडी, देवमळा, लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरगावचे ग्रामदैवत असलेल्या केदारलिंग आणि देवमळा येथील श्री देव गांगेश्वर मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून दोन्ही मंदिरातील 3500 रुपयांची चोरी केली. ग्रामस्थांना सकाळी दोन्ही मंदिरातील दानपेटय़ा फोडलेल्या दिसल्या. या प्रकरणी संदेश वामन खामकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञातावर भादंविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.