शिवारआंबेरेतील दुकानचालकाचा गंभीर आरोप; पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार
रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील शिवारआंबेरे येथे जुगाराच्या कारावाईचा बहाणा करून आलेल्या पोलिसांनी दुकान चालकाकडील अडीच लाख रूपयांची रोकड हिसकावून नेली, असा गंभीर आरोप दुकान चालकाकडून करण्यात आला आह़े विकास चंद्रकांत मयेकर (ऱा शिवारआंबेरे रत्नागिरी) असे या दुकानचालकाचे नाव आह़े या प्रकरणी मयेकर यांनी 3 पोलीस कर्मचाऱयांविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारअर्ज दाखल केला आह़े.
विकास मयेकर यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जानुसार, शिवारआंबेरे येथे मयेकर यांचे किराणा मालाचे दुकान आह़े 10 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास त्यांची बहीण रश्मी रूपेश पाटील ही दुकानात असताना 3 पोलीस अंमलदार त्यांच्या दुकानात शिरल़े ‘आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयातून आलो आहोत, तुमच्या येथे बेकायदेशीर मटका जुगार व्यवसाय चालतो, अशी माहिती मिळाल्याचे सांगून दुकानात घुसून शोधाशोध केल़ी मात्र पोलिसांना जुगाराबाबत कोणतेही साहित्य किंवा मुद्देमाल न मिळून आला नाह़ी यावेळी पोलिसांनी दुकानात बसलेले माझे बहिणीचे पती रूपेश विष्णू पाटील यांचे मोबाईलवर मटका जुगाराचे आकडे टाईप केल्याचे सांगितल़े तसेच आपण बँकींग व्यवहाराची कलेक्शन केलेली दुकानातील रोख रक्कम 2 लाख पन्नास हजार रूपये जबरदस्तीने घेऊन गेले व त्या बाबत कोणताही पंचनामा केलेला नाही किंवा घटनास्थळी जबाब नोंदवलेले नाही, असा आरोप मयेकर यांनी तक्रार अर्जात केला आह़े या बाबत मयेकर हे पूर्णगड सागरी पोलीस स्थानक येथे रक्कम अनाधिकाराने नेल्याबाबत तक्रार नोंदवण्यास गेल़े यावेळी पूर्णगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करा ते आम्हांला आदेश देतील, असे सांगून आम्हांला पोलीस ठाण्यातून हाकलून दिल्याचा आरोप मयेकर यांनी तक्रार अर्जात केला आह़े