पाठपुराव्याला यश- आ. विक्रम सावंत
जत- प्रतिनिधी
जत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जे जे करता येईल ते करण्याचे आश्वासन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील संख येथे ग्राम न्यायालय मंजूर केल्याने जतचे आमदार विक्रम दादा सावंत यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
जत तालुक्याचा विस्तार पाहता पूर्व भागात एक स्वतंत्र न्यायालय असावे अशी मागणी आमदार सावंत यांनी वारंवार केली होती, त्याला यश आल्याचेही ते म्हणाले. आमदार सावंत म्हणाले, जत तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे येथील विकासाला येणारा निधी अपुरा पडतो . तसेच प्रशासकीय आणि न्यायालयीन कामकाजात ही लोकांना वेळ, पैसा खर्च करावा लागत होता. या प्रश्न आपण सतत मागच्या सरकारकडे आणि याही सरकारकडे अशा कामांची मागणी केली होती.
त्यानुसार मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील संख येथे ग्राम न्यायालय मंजूर केले आहे . यामुळे आता पूर्व भागातील लोकांचे न्यायालयीन कामकाज सुलभ होणार आहे. संख येथील ग्राम न्यायालयात पाच पदे ही मंजूर करण्यात आले आहेत. येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी असणार आहेत. या निर्णयाने जत तालुक्यातील समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे.