संचालिका स्मृती राजगाढिया यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
कलेच्या माध्यमातून आनंद आणि सर्वसमावेशक असा जागतिक पातळीवरील महत्त्वाचा कला महोत्सव म्हणजे सेरेंडिपिटी कला महोत्सव दि. 15 रोजी ते दि. 23 रोजीपर्यंत पणजीतील एकूण 14 ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. 120हून जास्त कार्यक्रम, 500हून जास्त कलाकारांचा समावेश या महोत्सवात असणार आहे अशी माहिती सेरेंडिपिटी आर्ट्स फाऊंडेशनच्या संचालिका स्मृती राजगाढीया यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पाचव्या आवृत्तीतील हा महोत्सव कलांच्या पलीकडचा असेल. मांडवी नदीकिनारी स्थित ऐतिहासिक मूल्यासाठी, नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि कलांशी आत्मियता असलेले जुने गोमेकॉ कॉम्प्लेक्स हे महोत्सवाचे मुख्य ठिकाण असणार आहे. सेरेंडिपिटी कला महोत्सव हा सर्वांसाठी प्रवेशयोग्य असणार आहे. दिव्यांग तसेच मुलांच्या कार्यक्रमांवर विशेष कार्यक्रम असतील. याचबरोबर चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन, भारताचा कला इतिहास यावर प्रमोद कुमार केजी प्रकाश टाकणार आहेत. अंजना सोमणी हस्तकलेचे जग आणि अवकाशनिर्मितीद्वारे भौतिकतेची समृद्ध परंपरा यावर प्रकाश टाकतील. कासार ठाकोर पद्मसी हे काही निवडक नाटकांचे प्रदर्शन करतील. प्रल्हाद सुखटणकर पाककलेचे गुणांकन करतील. ब्रिकम घोष आणि एहसान नुरानी यांच्या मैफिली, गीता चंद्रन आणि मयुरी उपाध्याय शास्त्राrय समकालीन नृत्याचे सादरीकरण करतील अशी माहिती स्मृती यांनी दिली.
महोत्सव काळात प्रतिनिधींसाठी मोफत वाहतूकीची सोय करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सेवा, प्रवेश सुलभतेसाठी रॅम्प, रेलची सोय करण्यात आली आहे. याशिवाय प्रतिनिधींना रांगेचा त्रास होऊ नये यासाठी नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. प्रत्येक महोत्सव स्थळांवर पाण्याची सोय करण्यात आली असल्याचे स्मृती यांनी सांगितले.
संस्कृती हा आपल्या अस्तित्त्वाचा आधार आहे. सेरेंडिपिटी कला महोत्सवासारखे सांस्कृतिक उत्सव हे सर्जनशील मार्ग सक्रीय तर करतात. याशिवाय संपूर्ण अर्थव्यवस्थेला आधार देतात. विशेषतः पर्यटन उद्योग जो पणजीतील रोजगार निर्मितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे असे मत पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी यावेळी व्यक्त केले. हा महोत्सव गोव्यातील सर्जनशीलता आणि संस्कृतीची ओळख करून देतो. गोव्याचा वारसा तसेच कलेचे विविध प्रकार विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य हा महोत्सव करतो. गोव्याला कला, संस्कृती आणि मनोरंजनाचे केंद्राचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी एक व्यासपीठ आहे असे मत गोवा मनोरंजन सोसायटीच्या महाव्यवस्थापक मृणाल निकेत वाळके यांनी यावेळी व्यक्त केले.
या महोत्सवात डॉ. डॉ. ज्योतिंद्र जैन यांचे विशेष अभिलेख प्रदर्शन आणि जुत्ता जैन न्यु बौअर; राहाब अल्लाना यांच्यातील आंतरराष्ट्रीय सहयोग आणि पास्कल ब्यूसे एनएफटीवर प्रदर्शन असेल आणि हरकत स्टुडिओद्वारे क्मयुरेट केलेले चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.