प्रतिनिधी/ पणजी
भारतीय घटनेने प्रत्येक माणसाला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे. हा प्रश्न जसा दुसऱयाला विचारणे अपेक्षित आहे. तसाच तो स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीलाही विचारणे तेवढेच अपेक्षित आहे. ज्यावेळी आपण स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करू, त्यातून आपलीच आपणास ओळख होत जाईल आणि मग पुढच्या सगळय़ाच गोष्टी सोप्या होऊन जातील. त्यामुळे प्रथम स्वतःला प्रश्न विचारायची सवय लावून घ्या, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश जस्टीस डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी केले.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऍण्ड लिगल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, गोवा-इंडिया या देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय कायदा शिक्षण विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी या नव्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती जस्टीस पी. एस. नरसिंहा (सुप्रिम कोर्ट जज), कुलगुरू प्रोफेसर डॉ. विद्या राघवन, केंद्रीय कायदामंत्री किरण रिजीज्यु, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टीस भूषण गवई, जस्टीस सूर्यकांत, महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे जस्टीस दीपंकर दत्ता, बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र-गोवाचे सदस्य व गोव्याचे गार्डीयन ऍड. संग्राम देसाई, ऍड. आशिष देशमुख, ऍड. विवेकानंद गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते.

बार कौन्सील ऑफ इंडिया या ट्रस्टतर्फे स्थापन करण्यात आलेले हे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय लिगल एज्युकेशन विद्यापीठ ठरले आहे. 9 डिसेंबरपासून या विद्यापीठाचे काम सुरू झाले. या विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, या विद्यापीठाचे कुलपती जस्टीस नरसिंहा, जस्टीस भूषण गवई यांनी देखील मार्गदर्शन केले. या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कायदा तज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच देशाचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गेस्ट लेक्चरर म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कायद्याचं शिक्षण, कायद्याचं संशोधन, कायदा प्रॅक्टीस करणाऱया वकिलांसाठी मार्गदर्शन आणि पॅक्टीकल, थिअरॉटीकल एज्युकेशन या चार उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
बार कौन्सील ऑफ इंडिया आणि या विद्यापीठामध्ये सुसंवाद राहावा, यासाठी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सीलच्यावतीने एक त्री सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यामध्ये या महाराष्ट्र-गोवा बार कौन्सीलचे सदस्य ऍड. संग्राम देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे. ही फार मोठी जबाबदारी समजली जाते. या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा कोकणातील विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.









