सुपरओव्हरमध्ये 4 धावांनी मात, स्मृती मानधना सामन्यात सर्वोत्तम
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रविवारच्या येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या दुसऱया थरारक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सुपरओव्हरमध्ये 4 धावांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या विजयामध्ये सामनावीर स्मृती मानधनाचा वाटा महत्त्वाचा ठरला.
या दुसऱया सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. मैदानावर दव पडत असल्याने भारताने हा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी 20 षटकात 1 बाद 187 धावा जमवित भारताला 188 धावांचे कठीण आव्हान दिले. त्यानंतर भारताने 20 षटकात 5 बाद 187 धावा जमवित बरोबरी साधली. पंचांनी यानंतर सुपरओव्हरचा अवलंब केला. सुपरओव्हरमध्ये भारताने 1 बाद 20 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियाच्या नवोदित हीदर ग्रॅहमने हे षटक टाकले. या षटकामध्ये मानधनाने 1 षटकार आणि 1 चौकार ठोकला. तत्पूर्वी रिचा घोषने पहिल्या चेंडूवरच षटकार नोंदविला होता. भारतातर्फे रेणुका सिंग ठाकुरला सुपरओव्हर टाकण्याची संधी देण्यात आली. रेणुका सिंगने या षटकात ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसा हिलीला बाद केले. तसेच त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखत अखेर आपल्या संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने सुपरओव्हरमध्ये 1 गडी गमावत 16 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 4 धावांनी गमवावा लागला. 2022 च्या क्रिकेट हंगामात ऑस्ट्रेलियन महिला संघाचा हा पहिला पराभव आहे. भारतीय महिलांचा हा सुपरओव्हरपर्यंत खेळलेला पहिलाच सामना आहे. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. या मालिकेतील पहिला सामना ऑस्टेलियाने 9 गडय़ांनी जिंकला होता.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये कर्णधार ऍलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजीला प्रारंभ केला. षटकामागे 10 धावांची सरासरी राखण्यावर त्यांचा भर होता. पण चौथ्या षटकातील तिसऱया चेंडूवर दीप्ती शर्माने हिलीला वैद्यकरवी झेलबाद केले. हिलीने 15 चेंडूत 5 चौकारांसह 25 धावा झळकविल्या. भारतीय गोलंदाजांना या सामन्यात मिळालेले हे एकमेव यश ठरले. त्यानंतर बेथ मुनी आणि ताहलिया मॅकग्रा या जोडीने दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 158 धावांची विक्रमी भागीदारी केली. मुनीने 54 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 82 तर मॅकग्राने 51 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 70 धावा फटकावल्या. या मालिकेतील मॅकग्रा आणि मुनी यांची ही सलग दुसरी शतकी भागीदारी आहे. या सामन्यात त्यांनी 99 चेंडूत 158 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या सलामीच्या जोडीने 52 चेंडूत 74 धावांची भागीदारी केली. शेफाली वर्माने 23 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 34 धावा फटकावल्या तर जेमिमा रॉड्रिग्ज 4 धावांवर पायचीत झाली. कर्णधार हरमनप्रित कौरने 22 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 धावा जमविताना मानधनासमवेत तिसऱया गडय़ासाठी 61 धावांची भर घातली. स्मृती मानधनाने चौफेर फटकेबाजी करीत केवळ 49 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह 79 धावा झोडपल्या. सुदरलँडने तिचा त्रिफळा उडविला. रिचा घोषनेही 13 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 26 धावा काढल्या तर दीप्ती शर्माने 2 धावा केल्या. देविका वैद्यने 5 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. रिचा घोषने 18 व्या षटकात 3 षटकार मारल्याने भारताला 12 चेंडूत 18 धावा असे समीकरण मिळाले.
शेवटच्या षटकात 14 धावा हव्या असताना रिचा घोष व देविका वैद्य यांनी पाच धावा पळून काढल्या तर दुसऱया व शेवटच्या चेंडूवर वैद्यने दोन चौकार मारत सामना टाय केला. भारताने 20 षटकात 5 बाद 187 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये 9 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे ग्रॅहॅमने 3 तर किंग आणि सुदरलँड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 20 षटकात 1 बाद 187 (हिली 25, मुनी नाबाद 82, मॅकग्रा नाबाद 70, दीप्ती शर्मा 1-31), भारत 20 षटकात 5 बाद 187 (स्मृती मंदाना 79, शेफाली वर्मा 34, रॉड्रिग्ज 4, हरमनप्रित कौर 21, रिचा घोष नाबाद 26, दीप्ती शर्मा 2, देविका वैद्य नाबाद 11, ग्रॅहम 3-22, किंग 1-17, सुदरलँड 1-14). सुपरओव्हरमध्ये भारत 1 बाद 20, ऑस्ट्रेलिया 1 बाद 16 धावा.









