दुसऱया सामन्यात पाकचा 26 धावांनी पराभव, इंग्लंडचा हॅरी ब्रुक ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ मुल्तान
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने यजमान पाकविरुद्ध 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. सोमवारी येथे झालेल्या दुसऱया सामन्यात इंग्लंडने पाकचा चौथ्या दिवशीच 26 धावांनी पराभव केला. या मालिकेत आता इंग्लंडचा संघ एकतर्फी विजय मिळविण्याच्या दिशेने सज्ज झाला आहे.
या दुसऱया कसोटीत इंग्लंडने पाकला विजयासाठी 355 धावांचे आव्हान दिले होते. पण मार्क वूडच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकचा दुसरा डाव 102.1 षटकात 328 धावात आटोपला. मार्क वूडने 65 धावात 4 बळी मिळविले. रॉबिनसन आणि अँडरसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. इंग्लंड संघाची तब्बल 17 वर्षांनंतर पाकमधील ही पहिली कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकचा 74 धावांनी पराभव केला होता.

पाकने 4 बाद 198 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली. रुटने अश्रफला झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. शकील आणि मोहम्मद नवाज यांनी सहाव्या गडय़ासाठी 80 धावांची भर घातली. मार्क वूडने नवाजला पॉपकरवी झेलबाद केले. त्याने 7 चौकारांसह 45 धावा जमविल्या. शकीलने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पण वूडने त्याचे स्वप्न अधुरे ठरविले. वूडच्या गोलंदाजीवर शकील झेलबाद झाला. त्याने 213 चेंडूत 8 चौकारांसह 94 धावा जमविल्या. शकीलचे शतक 6 धावांनी हुकले. सलमानने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 4 चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या. इमाम उल हकने 7 चौकारांसह 60 धावांचे योगदान दिले. शकीलचे हे या मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक आहे. शकील आणि मोहम्मद नवाज यांनी तब्बल 22 षटके खेळून काढल्याने इंग्लंडचा विजय लांबला.
पाकला विजयासाठी 109 धावांची जरुरी असताना इंग्लंडने दुसरा नवा चेंडू घेतला आणि पाकचे तळाचे फलंदाज झटपट गुंडाळण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळाले. सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पाकच्या उर्वरित 6 फलंदाजांनी 130 धावांची भर घातली. रॉबिनसनने मोहम्मद अलीला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद करून पाकचा डाव 102.1 षटकात 328 धावात संपुष्टात आणत इंग्लंडचा विजय साकार केला. इंग्लंडतर्फे मार्क वूडने 65 धावात 4, अँडरसनने 44 धावात 2, रॉबिनसनने 23 धावात 2 तर लिच आणि रुट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नवे प्रशिक्षक ब्रेन्डॉन मेकॉलम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्णधार स्टोक्सच्या नेतृत्वाखाली अलीकडच्या कालावधीत इंग्लंडने नऊपैकी आठ कसोटी सामने जिंकले आहेत.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव सर्वबाद 281, पाक प. डाव सर्वबाद 202, इंग्लंड दु. डाव सर्वबाद 275, पाक दु. डाव 102.1 षटकात सर्वबाद 328 (शकील 94, शफीक 45, रिझवान 30, इमाम उल हक 60, अश्रफ 10, मोहम्मद नवाज 45, सलमान नाबाद 17, अब्रार अहमद 17, मार्क वूड 4-65, अँडरसन 2-44, रॉबिनसन 2-23, लिच 1-113, रुट 1-65).









