वृत्तसंस्था/ ऍडलेड
यजमान ऑस्ट्रेलिया आणि विंडीज यांच्यात येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाने विंडीजला निर्णायक विजयासाठी 497 धावांचे कठीण आव्हान दिले असून विंडीजची दुसऱया डावात स्थिती 4 बाद 38 अशी केविलवाणी झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून आता ते विंडीजचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 7 बाद 511 धावांवर घोषित केला. लाबुशेन आणि हेड यांनी शानदार दीडशतके झळकविली. त्यानंतर विंडीजचा पहिला डाव 214 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाने विंडीजवर 297 धावांची भक्कम आघाडी मिळविली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने उपलब्ध असूनही विंडीजला फॉलोऑन दिला नाही. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 6 बाद 199 धावांवर घोषित करून विंडीजला शेवटच्या दोन दिवसांमध्ये विजयासाठी 497 धावांचे कठीण आव्हान दिले. विंडीजची दुसऱया डावातही घसरगुंडी उडाली. दिवसअखेर त्यांनी 22 षटकात 4 बाद 38 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी विंडीजवर मोठय़ा फरकाने विजय मिळविण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
विंडीजच्या पहिल्या डावात चंद्रपॉलने 47, फिलिपने 43, ब्रेथवेटने 19, डिसिल्वाने 23, चेसने 34 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे लियॉनने 57 धावात 3 तर स्टार्क आणि नवोदित नेसर यांनी प्रत्येकी 2 तसेच ग्रीनने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 297 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर त्यांनी दुसऱया डावात आक्रमक फलंदाजीवर अधिक भर दिला. उस्मान ख्वाजाने 7 चौकारांसह 45, वॉर्नरने 3 चौकारांसह 28, लाबुशेनने 3 चौकारांसह 31, कर्णधार स्मिथने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 35, हेडने 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 38 धावा जमविल्या. 31 षटकाअखेर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 6 बाद 199 धावांवर घोषित केला. विंडीजच्या जोसेफने 3 तर चेसने 2 आणि फिलिपने 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर विंडीजचा दुसरा डावही घसरला. बोलँडच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे पहिले चार फलंदाज केवळ 9 षटकात तंबूत परतले. कर्णधार ब्रेथवेटने 3, चंद्रपॉलने 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. ब्रुक्स आणि ब्लॅकवूड यांना खातेही उघडता आले नाही. थॉमस आणि होल्डर हे प्रत्येकी 8 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे नवोदित बोलँडने 9 धावात 3 तर स्टार्कने 11 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव 7 बाद 511 (डाव घोषित), विंडीज प. डाव 69.3 षटकात सर्वबाद 214 (चंद्रपॉल 47, फिलिप 43, ब्रेथवेट 19, डिसिल्वा 23, चेस 34, लेयॉन 3-57, स्टार्क 2-48, नेसर 2-34, ग्रीन 1-44), ऑस्ट्रेलिया दु. डाव 31 षटकात 6 बाद 199 (डाव घोषित), (ख्वाजा 45, वॉर्नर 28, लाबुशेन 31, स्मिथ 35, हेड नाबाद 38, जोसेफ 3-33, फिलिप 1-44, चेस 2-34), विंडीज दु. डाव 22 षटकात 4 बाद 38 (चंद्रपॉल 17, ब्रेथवेट 3, थॉमस खेळत आहे 8, होल्डर खेळत आहे 8, बोलँड 3-9, स्टार्क 1-11).









