मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री ः आज शपथबद्ध होणार
शिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशमध्ये प्रदीर्घ बैठकसत्रानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सुखविंदर सिंग सुक्खू हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शनिवारी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर मुकेश अग्निहोत्री हिमाचलचे उपमुख्यमंत्री असतील. आता शपथविधी आज म्हणजे रविवार, 11 डिसेंबर रोजीच करण्याची माहितीही देण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून हिमाचलच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स सुरू होता. त्यावरील तिढा सद्यस्थितीत सोडवण्यात आला असला तरी हायकमांडच्या या निर्णयानंतर प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत धरणे आंदोलन केल्याचे समजते. प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर हिमाचल प्रदेशमध्ये पुढील मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. काँग्रेसचे नेते सुखविंदर सुक्खू यांची हिमाचल प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर निरीक्षकांनी सुक्खू यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्यासोबत प्रतिभा सिंह यांच्या गटातील मुकेश अग्निहोत्री यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता शपथविधी होणार आहे. यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सुखविंदर सुक्खू यांनी राज्यपालांची भेट घेत वेळ मागितली आहे.
हिमाचलमध्ये 8 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्री निवडीसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले होते. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनीही 40 जागा जिंकून बहुमत मिळवणाऱया काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. शुक्रवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी प्रतिभा सिंह आणि सुखविंदर सुक्खू यांच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी दिसून आली होती. मात्र, आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर सुखविंदर सिंग सुक्खू हे शर्यतीत पुढे होते. अखेरीस काँग्रेस हायकमांडनेही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आमदारांनी हायकमांडकडे जबाबदारी सोपवली होती. हायकमांडने सुखविंदर सुक्खू यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आणि त्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. तर, मुकेश अग्निहोत्री यांना हिमाचलचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पर्यवेक्षक भूपेश बघेल यांनी सांगितले.
नादौनमधून चौथ्यांदा आमदार
मुख्यमंत्रीपदी निवड झालेले सुखविंदर सिंग सुक्खू हे हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख होते. नादौनमधून ते चौथ्यांदा आमदार झाले आहेत. यावेळी त्यांनी नादौन मतदारसंघातून भाजपचे विजय अग्निहोत्री यांचा 3,363 मतांनी पराभव केला. त्यांचा जन्म 26 मार्च 1964 रोजी नादौन येथे झाला. हिमाचल प्रदेश विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.









