दिल्ली विमानतळापेक्षा तिप्पट ः वार्षिक 12 कोटी प्रवासी क्षमता
रियाध / वृत्तसंस्था
जगातील सर्वात मोठे विमानतळ सौदी अरेबियात बांधले जाणार आहे. ते भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा तिप्पट मोठे असणार आहे. 2030 मध्ये पूर्ण होणाऱया या विमानतळामुळे सौदीच्या अर्थव्यवस्थेतही सुधारणा होणार आहे. यासोबतच 26 लाख भारतीय आणि जगभरातील लाखो पर्यटकांचा प्रवास सुकर होणार आहे.
सौदी अरेबियाचे ‘किंग’ मोहम्मद बिन सलमान सध्या एका मोठय़ा प्रकल्पावर काम करत आहेत. ते देशात जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधत आहेत. प्रवाशांच्या संख्येच्या बाबतीत हे विमानतळ जगातील सर्वात मोठे विमानतळ असेल, असा दावा केला जात आहे. त्याचे बांधकाम 57 किमी परिसरात सुरू आहे. यात 6 धावपट्टय़ा असतील. सौदी अरेबिया व्हिजन 2030 वर काम करत आहे, ज्या अंतर्गत इतके मोठे प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
केवळ विमानतळच नाही तर सौदी अरेबिया निओम शहर देखील बनवत असून त्याचे पहिले मॉडय़ूल 170 किमी लांब असेल. तसेच पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड हा 2 किमी उंच मेगा टॉवर बांधण्याची योजना आखत आहे. आतापर्यंत, राजधानी रियाधच्या उत्तरेकडील भागात 18 किमी रुंद परिसरात सुरू असलेल्या विकास योजनेत ही बहुमजली इमारत तयार करण्याची तयारी सुरू आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मेगा टॉवर बुर्ज खलिफापेक्षा एक-दोन मजले उंच नसून त्याच्या दुप्पट उंचीचा असेल.
‘बुर्ज खलिफा’पेक्षा दुप्पट उंचीची इमारत
आतापर्यंत, जगातील सर्वात उंच इमारतीचा उल्लेख होताच संयुक्त अरब अमिराती म्हणजेच ‘युएई’च्या बुर्ज खलिफाचे नाव घेतले जाते. मात्र, लवकरच ती भूतकाळातील गोष्ट होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. जगातील सर्वात उंच इमारत ही बुर्ज खलिफाची बिरुदावली मागे पडण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आता त्यांच्या शेजारील देशात असलेल्या या इमारतीपेक्षा उंच इमारत बांधण्याच्या तयारीत आहेत.
5 अब्ज डॉलर्स इतका खर्च अपेक्षित
बुर्ज खलिफाची उंची 828 मीटर आहे, तर सौदी अरेबिया दुप्पट उंच इमारत बांधणार आहे. रियाधमध्ये बांधण्यात येणारी दोन किमी उंचीची इमारत तयार करण्यासाठी सुमारे 5 अब्ज डॉलर्स इतका खर्च येईल. ही वास्तू बनवण्यासाठी सध्या डिझाईनची स्पर्धा सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये सहभागी होण्यासाठी 10 लाख डॉलर्स शुल्क जमा करण्याची अट आहे.









