वृत्तसंस्था/ बिजींग
गेले 15 दिवस चीनमध्ये होत असलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांच्या निदर्शनांचा विचार करून चीनने कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. शून्य कोरोना धोरणाअंतर्गत चीनने आपल्या नागरिकांवर बरीच बंधने घातली होती. महत्त्वाच्या शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन घोषित केला होता. तथापि त्यामुळे निर्माण होणाऱया अडचणींमुळे नागरिक वैतागले होते. त्यांनी हे निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी करत आपल्याच सरकार विरोधात प्रचंड निदर्शने केली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन विद्यार्थी आणि तरुणांच्या मागणीचा विचार करण्यात आला. तसेच काही अटींसह निर्बंध शिथील करण्यात आले. आता आंदोलने संपतील असा विश्वास चिनी नेतृत्वाने प्रकट केला आहे. चीनमध्ये सध्या पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असून प्रतिदिन 30 हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चीन सरकारने शून्य कोरोना धोरणाचा अवलंब केला होता. त्याविरोधात असंख्य चिनी नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात प्रचंड निदर्शने आणि आंदोलने चालविली आहेत. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या राजीनाम्याचीही मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली होती. मात्र आता चिनी प्रशासनाने काही प्रमाणात निदर्शकांसंबंधी सौम्य भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.