वृत्तसंस्था/ लिमा (पेरु)
येथे सुरू असलेल्या पॅरा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू तृतीय मानांकित सुकांत कदमने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये भारताने दमदार यश मिळविताना 6 सुवर्ण, 1 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 14 पदकांची लयलूट केली आहे.
सुकांत कदमने एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंगापूरच्या ची हिआँग ऍनेगचा 32 मिनिटांच्या कालावधीत 21-14, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. महिलांच्या एसएच6 आणि एसएल3 या प्रकारात भारताच्या नित्या श्रीसुमती आणि मनदीप कौर यांनी एकेरीत सुवर्णपदके मिळवली. नित्याने पेरुच्या फ्लोरेसचा 21-6, 21-13 तर मनदीप कौरने अंतिम सामन्यात युपेनच्या कोझिनाचा 21-11, 21-11 असा पराभव केला. भारताच्या नेहाल आणि ब्रेनो जोहान यांनी पुरुष दुहेरीतील सुवर्णपदक तसेच भारताच्या पारुल परमार आणि वैशाली निलेश पटेल यांनी महिला दुहेरीतील सुवर्णपदके मिळवली. नेहाल आणि ब्रेनो यांनी अंतिम लढतीत पेरुच्या मोरालेस आणि व्हिनेटा यांचा 21-16, 21-13 तर महिलांच्या विभागातील अंतिम लढतीत पारुल आणि वैशाली यांनी पेरुच्या केलि इस्क्लेंट आणि मनदीप यांचा 21-17, 21-19 असा पराभव केला.









