छत्तीसगडमधील धक्कादायक घटना ः रुग्णालयात उडाली खळबळ
वृत्तसंस्था / अंबिकापूर
छत्तीसगडच्या देवेंद्र कुमारी सिंहदेव मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात सोमवारी पहाटे वीज गेल्याने रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये 4 नवजातांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालय व्यवस्थापनासह प्रशासकीय अधिकाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हेंटिलेटर बंद पडल्याने नवजातांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोग्यमंत्री टी. एस. सिंहदेव हे तातडीने आरोग्यसचिवांसह अंबिकापूर येथे पोहोचले आहेत.
नवजातांच्या मृत्यूची कल्पना वीज आल्यावर देण्यात आल्याचा आरोप संबंधिताच्या कुटुंबीयांनी केला आहे. नवजातांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरताच रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. जिल्हाधिकारी कुंदन कुमार, पोलीस अधीक्षक भावना गुप्ता, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमनेश मूर्ती यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी रुग्णालयात धाव घेतली. तर नवजातांच्या मृत्यूप्रकरणी विस्तृत चौकशीचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.









