ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटाचे नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी मालेगावातील भाजप नेते अद्वय हिरे (Adway Hire)यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
मंत्री दादा भुसे यांनी मालेगावातील बोरे आंबेदरी येथील पाण्याची चारी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शनिवारी याच विषयावरून एका शेतकऱ्याने विष प्राशन केलं होतं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. चारी बंद करून पाईपलाईनद्वारे पाणी नेल्यास या भागातील अनेक शेतकऱ्यांची जमीन ओसाड होऊन पिके उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. दादा भुसे हे ठेकेदाराला पोसण्यासाठी चारी बंद करून पाईपलाईनद्वारे पाणी पिण्याचा घाट घालत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
अधिक वाचा : शिक्षक बदल्यांना स्थगिती
मालेगाव मधील भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहून दादा भुसे यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप अणि शिंदे गटात ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.