पुणे / प्रतिनिधी :
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकमध्ये न येण्यास सांगणे म्हणजे थेट धमकीच आहे. कुणालाही कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना दिले.
पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सावंत म्हणाले, बोम्मई यांचे वक्तव्य म्हणजे सरळसरळ धमकी आहे. हे वक्तव्य म्हणजे मूलभूत अधिकारावर गदा आणणारे आहे. कोणालाही कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे.
मुंबईतील उपकर प्राप्त जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातच विधेयक मांडण्यात आले होते. दोन्ही सभागृहाच्या मंजुरीनंतरही केंद्र सरकारकडून विधेयक जाणूनबुजून प्रलंबित ठेवण्यात आले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
विधेयकासाठी खासदार म्हणून पाठपुरावा केला होता. विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याने शिवसेनेच्या प्रयत्नांना यश आल्याचा आनंद आहे, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात विधानसभेत विधेयक मांडण्यात आले होते. त्याला विधानसभा आणि विधानपरिषदेची मंजूरी मिळाली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरही गेल्या दोन वर्षांपासून विधेयक प्रलंबीत होते. त्याविरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी हा विषय प्राधान्याने हाताळला, असेही सावंत यांनी सांगितले.