विजय सरदेसाई यांची टीका , सरकारच्या नोकरभरती कारभाराचा निषेध
प्रतिनिधी/ पणजी
पोलीस खात्यातील 145 उपनिरीक्षक भरतीप्रक्रियेत घोटाळा झाल्याचे पोलीस महासंचालक जसपालसिंग यांना दाखवून दिल्यानंतर भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. वास्तविक ही प्रक्रिया पूर्ण रद्द करूनच नव्याने भरतीप्रक्रिया होणे गरजेचे होते. मात्र तसे न करता सरकारने गौडबंगाल करून 145 उमेदवारांची उपनिरीक्षकपदासाठी निवड झाल्याचे जाहीर केले असून हा एक मोठा घोटाळा आहे. एकूणच अपात्र उमेदवारांची निवड करून पात्र उमेदवारांवर अन्याय केल्याचे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. सरकारच्या या कारभाराचा आपण निषेध करीत असून या प्रकारावर योग्यरितीने अभ्यास करून पुढील कृती करणार असल्याचा इशाराही सरदेसाई यांनी दिला आहे.
उपनिरीक्षक निवडप्रक्रियेबाबत विजय सरदेसाई यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पुढे बोलताना सरदेसाई म्हणाले की, उपनिरीक्षकपदासाठी झालेल्या नोकरभरतीतील हेराफेरी चौकशीत उघड झाली आहे. दोन उमेदवार शारीरिक कार्यक्षमता चाचणीत अनुत्तीर्ण असूनही पात्र दाखविले आहेत. फोंडा, वाळपई, मडगाव, पणजी तसेच आल्तिनो या पाच ठिकाणी उपनिरीक्षकपदासाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेण्यात आली होती. तसेच लेखी परीक्षेतही काही उमेदवारांनाही 95 ते 99 गुण मिळाल्याचे दाखविले होते. त्यामुळे भरती प्रक्रियेवर संशय निर्माण झाला होता.
विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध खात्यात म़ोठय़ा प्रमाणात नोकरभरती केली होती. या नोकरभरतीप्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात घोटाळा झाल्याची टीका सर्वस्तरावरून झाली होती. इतकेच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील एक मंत्र्यांनीही नोकरभरतीसाठी उमेदवारांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातील पदभरती रद्द करण्यात आली होती, असेही सरदेसाई यांनी सांगितले.
सोशल मीडियावर तीव्र पडसाद
पोलीस खात्यातील उपनिरीक्षक भरती गैरप्रकाराची चौकशी सुरु असतानाच चौकशीचा अहवाल जाहीर न करताच वादग्रस्त भरतीप्रक्रियेत निवडण्यात आलेल्या उमेदवारांची उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही यादी पोलीस खात्याच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली तसेच पोलीस मुख्यालयातही लावण्यात आली आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटत आहेत.
उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेत, गुणपत्रिकेत मोठा फेरफार
पोलीस खात्यात 145 उपनिरीक्षकांची भरतीप्रक्रिया हाती घेण्यात आली होती. त्यात 122 पुरूष आणि 23 महिला उमेदवारांचा सहभाग होता. ही भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी उपनिरीक्षक भरतीप्रक्रियेत मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेत तसेच गुणपत्रिकेत मोठा फेरफार केल्याचा आरोप केला होता. शारीरिक चाचणीत नापास झालेल्या उमेदवारांची निवड करून या चाचणीत निवड झालेल्यांना डावलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे याप्रकरणात चौकशी करण्यासाठी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी उपअधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली पाच विविध समित्यांची नियुक्ती केली होती. चौकशीला सुरुवातही झाली होती, मात्र चौकशीचा अहवाल येण्याअगोदरच उमेदवारांची निवड होऊन ही यादी जाहीर केल्यामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे.