सर्व कार्यालय कॅमेरांच्या कक्षेत, 316 सीसीटीव्हींचा राहणार वॉच, सोमवारी ठेकेदाराला वकॅऑर्डर, कर्मचाऱ्यांना शिस्त, आंदोलकांवरही राहणार वचक
विनोद सावंत/कोल्हापूर
महापालिकेतील सर्व कार्यालय आता सीसीटीव्ही कॅमेरेच्या कक्षेत येणार आहेत. मनपा कर्मचारी, अधिकाऱयांवर 316 कॅमेराचा वॉच राहणार आहे. सोमवार (दि.7) ठेकेदाराला वकॅऑर्डर दिली जाणार असून यानंतर प्रत्यक्ष कॉमेरे बसविण्यास सुरवात होणार आहे. आयुक्त कार्यालयात याचे नियंत्रण असून महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची सर्व कार्यालयावर आत करडी नजर असणार आहे.
कोल्हापूर महापालिकेमध्ये 50 पेक्षा जास्त प्रमुख कार्यालय आहेत. यामध्ये नागरिकांना कामानिमित्त येथे यावे लागते. काही वेळेस कार्यालयात आल्यानंतर कर्मचारी, अधिकारी जाग्यावर नसतात. कोणी चहा पिण्यास गेल्याचे तर कोणी फिरतीला गेल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना मनपाच्या कामासाठी कार्यालयाच्या फेऱया माराव्या लागतात. आता असा प्रकारावर अळा बसणार आहे. महापालिका प्रशासनाने सर्व कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या इमारतीमध्ये 7 लाखांच्या निधीतून 70 कॅमेरे बसविले आहेत. यामध्ये सार्वजाणिक बांधकाम विभाग, नागरी सुविधा केंद्र, ब्यूरो, ड्रेनेज विभाग, मुख्य आरोग्य निरिक्षक कार्यालय, अग्निशमन दल कार्यालय, रेकॉर्ड विभाग, राजर्षी शाहू सभागृह, जनसंपर्क, आयुक्त कार्यालय, अतिरिक्त आयुक्त कार्यालयासह अधिकाऱयांच्या केबिनमध्ये कॅमेरे बसविले आहेत. दुसऱया टप्यात आता मुख्य इमारतीच्या बाहेरील कार्यालयातही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
28 लाखांच्या निधीतून आणखीन 246 कॅमेरे बसविणार
मनपाच्या चारही विभागीय कार्यालयासह इतर कार्यालयात 28 लाखांच्या निधीतून 246 कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्याचे टेंडर मंजूर झाले असून सोमवारी संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर दिली जाणार आहे. 45 दिवसांत सर्व ठिकाणचे कॅमेरे बसविण्याची अट घातली आहे.
यशपाल रजपूत, सिस्टिम मॅनेजर, महापालिका
पहिल्या टप्प्यातील कॉमेरेसाठी निधी – 7 लाख
मनपा मुख्य इमारतीत बसवलेले कॅमेरे – 70
दुसऱया टप्प्यासाठी निधी – 28 लाख
दुसऱया टप्प्यात कॅमेरे बसविणार – 246
कामाची मुदत – 45 दिवस
ठेकेदाराचे नाव – युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी
कॅमेरे बसविण्यात येणारे कार्यालय
चारही विभागीय कार्यालय
11 प्राथमिक आरोग्य केंद्र
पाणीपुरवठा विभागाचे सर्व फिल्टर हाऊस
संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह
गांधी मैदान येथील वाचनालय, स्पर्धा परिक्षा केंद्र
शिवाजी मार्केटमधील पाणीपुरवठा, शिक्षण समिती कार्यालय
शिवाजी मार्केटमधील इस्टेट, विवाह नोंदणी, एलबीटी कार्यालय, कार्यकारी अभियंता कार्यालय
पदाधिकाऱ्यांच्या कार्यालय वगळली
महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील सर्व कार्यालयात पहिल्या टप्प्यात कॅमेरे बसविले आहेत. मात्र, महापौर कार्यालयसह पदाधिकाऱयांची कार्यालयात कॅमेरे बसविण्यात आलेली नाहीत. ही कार्यालय वगळण्या मागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
कॅमेराचे प्रमुख फायदे
मनपाच्या सर्व कार्यालयावर प्रशासकांची नजर
कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लागणार
चोरीची घटना घडल्यास पोलिसांना तपासासाठी फुटेजचा उपयोग
आंदोलनावेळी अनुचित प्रकार घडल्यास सत्य स्थिती समजण्यास मदत
कार्यालयात तोडफोड, अधिकाऱ्यांना दादागिरी करणाऱ्यांचा पर्दाफाश