अधिकाऱ्यांना केल्या सूचना : सुवर्णसौध येथे बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळजोडणी केली जाणार आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सरकारने मुबलक अनुदान उपलब्ध केले होते. या जलनिर्माण प्रकल्पाचा आढावा जिल्ह्याचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला.
सुवर्णसौध येथे बैठक घेऊन त्यांनी या योजनेची माहिती घेतली. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत कचऱ्याचे नियोजनदेखील योग्यप्रकारे करण्याबाबत सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केली. जलजीवन मिशन योजना ही अनेक गावांमध्ये राबविण्यात आली आहे. त्या योजनेचे काम अनेक ठिकाणी पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणी अजूनही अर्धवट आहे. त्यामुळे या योजना पूर्ण करण्यासाठी सर्वांनी अधिक लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या.
जलजीवन मिशन योजनेबरोबरच कचरा तसेच इतर समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. अनुसूचित जाती-जमातीच्या वसाहतींमधील रस्ते तसेच पाणी समस्यांबाबतही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.