वृत्तसंस्था/ अहमदाबाद
शुक्रवारी येथे झालेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात शेल्डॉन जॅक्सनच्या नाबाद शतकाच्या जोरावर सौराष्ट्रने महाराष्ट्राचा 5 गडय़ांनी पराभव करत अजिंक्मयपद पटकाविले. सौराष्ट्र संघाने दुसऱयांदा विजय हजारे करंडकावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचे शतक वाया गेले. सौराष्ट्रच्या जॅक्सनला सामनावीर तर ऋतुराज गायकवाडला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडने सलग तीन शतके झळकविली.
या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 50 षटकात 9 बाद 248 धावा जमवित सौराष्ट्राला विजयासाठी 249 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर सौराष्ट्रने 46.3 षटकात 5 बाद 249 धावा जमवित सामना आणि स्पर्धा जिंकली.
महाराष्ट्राच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने 131 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह 108 धावा झळकविल्या. चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावचीत झाला. महाराष्ट्राच्या इतर फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. बच्छावने 3 चौकारांसह 27, अंकित बावनेने 2 चौकारांसह 16, काझीने 3 षटकार आणि 1 चौकारासह 37, नौशाद शेखने 4 चौकारांसह 31, नवलेने 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. सौराष्ट्रतर्फे चिराग जेनीने 43 धावात 3 तर मंकड, पार्थ आणि उनादकट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. महाराष्ट्राच्या डावात 7 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सौराष्ट्रच्या डावात जॅक्सनने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 136 चेंडूत 5 षटकार आणि 12 चौकारांसह नाबाद 133 धावा झळकविताना देसाई समवेत सलामीच्या गसाईनेडय़ासाठी 125 धावांची शतकी भागीदारी नोंदविली. देसाईने 67 चेंडूत 7 चौकारांसह 50, व्यासने 1 चौकारासह 12, वासवदाने 1 चौकारासह 15, तर चिराग जेनीने 25 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 30 धावा जमविल्या. जॅक्सन आणि जेनी यांनी सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 57 धावांची भागीदारी करून विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. महाराष्ट्रातर्फे मुकेश चौधरी आणि ओसवाल यांनी प्रत्येकी 2 तर बच्छावने 1 गडी बाद केला. सौराष्ट्रच्या डावात 5 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र 50 षटकात 9 बाद 248 (ऋतुराज गायकवाड 108, बच्छाव 27, काझी 37, शेख नाबाद 31, बावने 16, नवले 13, चिराग जेनी 3-43, उनादकट, मंकड, पार्थ प्रत्येकी 1 बळी), सौराष्ट्र 46.3 षटकात 5 बाद 249 (जॅक्सन नाबाद 133, चिराग जेनी नाबाद 30, देसाई 50, व्यास 12, वासवदा 15, चौधरी 2-38, ओसवाल 2-20, बच्छाव 1-66).









