ऑनलाईन टीम तरुण भारत
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे ४० आमदार गेले, १३ खासदार गेले पण शिवसेना (Shivsena)आणखीही तशीच आहे. मी लोकांमध्ये जातोय. शिवसेनेविषयी लोकांच्या मनात आदराची भावना आहे. नाशिकमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी भेटतायेत, सामान्य जनता भेटत आहे, सगळे आपापल्या जागेवर आहे, चिंता करण्याची गरज नाही, थोडासा पालापाचोळा हा उडत असतो तसा तो शिवसेनेतून उडून गेला असून शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी पुन्हा निवडून दाखवावे, असा घणाघात करत शिंदे गटात लवकरच स्फोट होईल, असं मोठं विधानही खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पत्रकारांशी देखील त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली. दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्याबाबत बोलतांना राऊत म्हणाले, मी खासदार असलो, तरी त्यापूर्वी एक क्राईम रिपोर्टर होतो. माझा पिंड पत्रकाराचा आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला चांगले कळते. शिंदे गटात काय सुरू आहे, हे मला माहिती आहे आणि लवकरच त्याचा स्फोट होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राऊतांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, बैठका घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेतलं बंड, शिंदे गटातली धुमश्चक्री, आगामी निवडणुका, तोंडावर आलेलं हिवाळी अधिवेशन यावर राऊतांनी आपली रोखठोक मतं व्यक्त केली.
नांदगावपासून मालेगावपर्यंत जे कुणी आमदार गेले त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, त्यांचं राजकीय करिअर आता संपलं. खासदार हेमंत गोडसे हे तिकडे गेल्यानंतर तर ‘प्यारे’ झाले. त्यांची राजकीय कारकीर्द आता संपुष्टात आलीये. त्यांनी स्वत:ची कबर स्वत: खोदलीये, अशा शब्दात त्यांनी हेमंत गोडसे यांना लक्ष्य केलं. तर गोडसे शिंदे गटात गेले, नाशिकला लोकसभेचा चेहरा कोण? या पत्रकारांच्या प्रश्नावर “हेमंत गोडसे हे काय चेहरा आहेत का?, असं राऊत म्हणताच पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला. शिवसेनेत चेहरा वगैरे काही नाही, शिवसेना हाच चेहरा, शिवसैनिक हीच आमची ताकद… शिवसैनिकच आमदार-खासदार निवडून देतात. शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. आम्हाला चिंता नाही”, असं पुढे बोलताना राऊत म्हणाले.