कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील हजारो भावी शिक्षक नोकरभरतीच्या प्रतिक्षेत असल्याने 50 टक्के नोकरभरती त्वरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, ही नुसती घोषणा नसून अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेत राज्य देशात पहिल्या तीनमध्ये असले तरी यंदा महाराष्ट्र अव्वल असले पाहिजे, अशी अपेक्षाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांकडून व्यक्त केली. शिक्षकांनी केलेल्या मागण्यांपैकी अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी कास्ट्राईब संघटनेच्या नेत्यांची मुंबईत बैठक घेवून निर्णय घेवू, असे आश्वासनही मंत्री केसरकर यांनी दिले.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री केसरकर बोलत होते. महासैनिक दरबारमध्ये झालेल्या अधिवेशनात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यातील विविध जिल्हय़ातील मागासवर्गीय प्रवर्गातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने मंत्री केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मंत्री केसरकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून, प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण दिले जाईल. इंग्रजी भाषेच्या मागे न लागता, मातृभाषेतून शिक्षण घेवून विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी बुध्दी खर्च केली पाहिजे. विद्यार्थ्यांना व्होकेशनलचे प्रशिक्षण देवून शिक्षण घेत रोजगाराची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातून भारताकडून प्रत्येक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ सर्व जगाला पुरवण्याचा मानस आहे. शिक्षकांनी बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान आत्मसाथ करून, गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे. तसेच विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा पुढचा टप्पा जाहीर केला असून, अघोषीत शाळांना मुख्य प्रवाहत घेतले आहे. शंभर टक्के केंद्र प्रमुखांची पदे भरली जाणार हे निश्चित असले तरी 50 टक्के पदभरतीच्या सूचना तातडीने दिल्या आहेत. तसेच मागासवर्गीयांना बिंदू नामावलीनुसार पदोन्नती दिली जाईल. कॅशलेश मेडीक्लेम, शिक्षकांच्या बदल्यांचा अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना देण्याचा प्रयत्न करणार.
विद्यार्थ्यांना वह्य़ा पुरवणार
सरकारच्या वतीने जी पुस्तके दिली जातात, त्याबरोबर विद्यार्थ्यांना वहय़ाही पुरवल्या जाणार आहेत. तसेच सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा सरकारचा विचार असून, किती खर्च येतो ते पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थी हितच मुख्य सरकारचा उद्देश असल्याने शिष्यवृत्तीची रक्कम वाढवली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी सांगितले.
मागासवर्गीय शिक्षकांवर अन्याय करणारांची चौकशी करा
कास्ट्राईब संघटनेने मागासवर्गीय शिक्षकांवर अधिकारी अन्याय करतात, अशी तक्रार मंत्री केसरकर यांच्याकडे केली. यावर मंत्री केसरकर यांनी शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना बोलावून संबंधीत अधिकाऱयांची चौकशी करण्याचे आदेश दिले. चुकीच्या पध्दतीने पदमान्यता दिल्या असतील तर त्याचीही चौकशी करणार असल्याचे सांगत, कोल्हापूर विभागातील अधिकाऱ्यांनी मागासवर्गीय शिक्षकांना चुकीची वागणूक दिल्यास करवाई करणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.








