पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) येत्या 3 डिसेंबर रोजी बेळगावात येणार असून, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नासंदर्भात चर्चा करणार आहेत. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रानुसार आपण बेळगावात येत असून, चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो, असे चंद्रकांतदादांनी म्हटले आहे.
यासंदर्भातील समितीचे पत्र चंद्रकांतदादांनी ट्विट केले असून, फेसबुकवरही शेअर केले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दि. 27 नोव्हेंबरच्या तारखेने चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांच्या नावे पत्र दिले होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सर्वौच्च न्यायालयात सुरू आहे. अशा वेळी आपली समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक झाली आहे. या व इतर काही प्रश्नांसंदर्भात बेळगावात येऊन आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी म. ए. समिती व कार्यकर्ते यांची इच्छा असल्याचे या पत्रात म्हटले होते. या पत्राला चंद्रकांतदादांनी ट्विटद्वारे तत्काळ प्रतिसाद दिला आहे.
बेळगावात येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मी आणि समन्वयकमंत्री शंभुराज देसाई येत्या 3 डिसेंबर रोजी दिवसभर बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. भेटूया, चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो, अशी भूमिका चंद्रकांतदादांनी यात मांडली आहे.
सीमाप्रश्नी गेल्या काही वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. अलीकडेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जतमधील 40 गावांबरोबरच अक्कलकोट व सोलापूरवर केलेल्या दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांचा हा बेळगाव दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
अधिक वाचा : उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर