केजरीवालांनी केला लेखी स्वरुपात दावा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष गुजरातमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी यासंबंधी लेखी दावा देखील केला आहे. माझी अशीच भविष्यवाणी दिल्ली अन् पंजाबमध्ये खरी ठरली होती. गुजरातची जनता पूर्णपणे घाबरली असल्याने उघडपणे आम आदमी पक्षाला पाठिंबा दर्शवू शकत नसल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. तसेच निवृत्त शासकीय कर्मचाऱयांना जुन्या योजनेनुसार निवृत्तीवेतन प्रदान करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
गुजरातमध्ये आम आदमी पक्ष सरकार स्थापन करणार अशी लेखी स्वरुपातील भविष्यवाणी जनतेसमोर करत आहे. 27 वर्षांच्या कुशासनानंतर गुजरातच्या लोकांना भाजपपासून मुक्तता मिळणार असल्याचे म्हणत केजरीवालांनी एका कागदावर आप विजयाचा मजकूर लिहित तो प्रसारमाध्यमांना दाखविला आहे.
जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्या करत असलेल्या शासकीय कर्मचाऱयांनी आम आदमी पक्षाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. गुजरातमध्ये नवी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तर जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत कर्मचाऱयांनी व्यापक आंदोलन केले होते. नवी पेन्शन योजना कर्मचाऱयांच्या हिताची नसल्याचे शासकीय कर्मचाऱयांचे मानणे आहे.
31 जानेवारीपर्यंत आम्ही गुजरातमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी एक अधिसूचना जारी करणार आहोत. पंजाबमध्ये आम्ही अशाप्रकारचा निर्णय घेतला असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. सर्व शासकीय कर्मचाऱयाचे प्रश्न आम्ही सोडविणार आहोत. आमच्या विजयात शासकीय कर्मचाऱयांचे सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पराभव दिसू लागल्याने भाजप बिथरला आहे. तर काँग्रेस या लढतीत कुठेच दिसून येत नाही. 27 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भाजपला पराभव दिसू लागला आहे. प्रत्येक जण ‘आप’ला मतदान करण्यासाठी भाजपची साथ सोडत आहे. आम्ही अनेक राज्यांमध्ये निवडणूक लढविली, परंतु केवळ गुजरातमध्येच लोक कुणाला मतदान करणार हे सांगण्यास घाबरत आहेत. काँग्रेसचे मतदार तर शोधूनही सापडत नसल्याची स्थिती आहे. भाजपचे समर्थक मोठय़ा संख्येत आम आदमी पक्षाला मतदान करणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.








