वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला रविवारी येथे होणाऱया दुसऱया सामन्यात विजयाची नितांत गरज असून भारतीय फलंदाजीला नवा दृष्टीकोन अवलंबणे जरुरीचे आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजता प्रारंभ होईल. दूरदर्शनवरून (डीडी स्पोर्ट्स) त्याचे प्रक्षेपण होईल.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 300 धावांचा टप्पा ओलांडूनही पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारच्या सामन्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले सेडॉन पार्कची खेळपट्टी फलंदाजीला अधिक अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याने भारतीय फलंदाजांना आपला ऍप्रोच बदलावा लागेल. पहिल्या सामन्यात कर्णधार धवन आणि गिल यांनी सलामीच्या गडय़ासाठी शतकी भागीदारी केली पण भारतीय फलंदाजांना या दुसऱया सामन्यात विजयासाठी नवा दृष्टीकोन हाताळणे जरुरीचे आहे. धवनने पहिल्या सामन्यात 77 चेंडूत 72 तर गिलने 65 चेंडूत 50 धावा झळकविल्या. धवनने आपल्या खेळीमध्ये 13 चौकार ठोकले. धवनने 13 चेंडूत 52 धावा जमविल्या. पण त्याला आणखी 20 धावा करण्यासाठी 64 चेंडूंना तोंड द्यावे लागले. त्यामध्ये 44 डॉटबॉल्सचा समावेश आहे. आता भारताच्या या सलामीच्या जोडीला पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करताना वेगळे तंत्र अवलंबावे लागेल. गिलने आपल्या अर्धशतकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार नोंदवला. याचा अर्थ त्याने 4 चेंडूत 22 धावा घेतल्या तर उर्वरित 28 धावांसाठी त्याला 61 चेंडू खेळावे लागले. पहिल्या 10 षटकामध्ये भारतीय फलंदाजांना धावांची गती वाढवताना चेंडूचाही विचार करावा लागेल.
ऑकलंडच्या पहिल्या सामन्यात भारताने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 40 धावा जमविल्या होत्या. भारतीय संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी नव्या खेळाडूमध्ये आता चुरस निर्माण झाली आहे. पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध होणाऱया मालिकेत कदाचित रोहित शर्मा समवेत धवन सलामीला फलंदाजी करण्याची शक्यता आहे. उपकर्णधार ऋषभ पंतला आपली फलंदाजी सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या समयोचित आक्रमक फलंदाजीमुळे पहिल्या सामन्यात भारताला 300 धावांचा टप्पा पार करता आला होता.
न्यूझीलंडचे फलंदाज चांगलेच फॉर्ममध्ये असल्याचे जाणवते. कर्णधार विल्यम्सन, ऍलेन, लॅथम आणि मिचेल यांच्या फलंदाजीत सातत्य असल्याचे दिसून येते. भारताची गोलंदाजी न्यूझीलंडच्या तुलनेत प्रभावी वाटत नाही. पहिल्या सामन्यात उमरान मलिक वगळता भारताच्या इतर गोलंदाजांना न्यूझीलंडच्या विल्यम्सन आणि लॅथम यांच्या फटकेबाजीला काबूत ठेवता आले नाही. रविवारच्या दुसऱया सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. भारतीय संघात या सामन्यासाठी बदल होण्याची शक्यता आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना फुलर लेंग्थ टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. यजुवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली जाईल, असे वाटते. या सामन्यात दुसऱया सत्रामध्ये धुके पडण्याची शक्यता असल्याने फिरकी गोलंदाजांना यश मिळणे अवघड जाईल. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सूर्यकुमार यादवची फलंदाजी बहरली होती पण न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो लवकर बाद झाला. रविवारचा हा दुसरा सामना निश्चितच शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे.
संभाव्य संघ- भारत – धवन (कर्णधार), गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हुडा, शहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, चहल, दीपक चहर, अर्शदीप सिंग, ठाकुर आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड- विलियमसन (कर्णधार), ऍलेन, कॉन्वे, लेथम, मिचेल, फिलिप्स, ब्रेसवेल, साऊदी, हेन्री, मिलेनी, निश्चाम, सँटेनर, फर्ग्युसन.
सामन्याची वेळ ः सकाळी 7 पासून
थेट प्रक्षेपण ः दूरदर्शन (डीडी स्पोर्ट्स)









