भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत बावनकुळे यांची गर्जना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणातील युवकांना रोजगार देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दोघेही नेते सक्षम आहेत. त्यामुळे कोणीही, कितीही विरोध केला तरी कोकणावर अन्याय होऊ देणार नाही. बहुचर्चित रिफायनरी प्रकल्प ज्या ठिकाणी ठरेल त्या ठिकाणी हा प्रकल्प होण्यासाठी भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीनिशी उतरेल. संघटनात्मक समर्थन उभे करेल, अशी गर्जना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार उभे आहेच. त्यामुळे आता रत्नागिरी-सिंधुदुर्गातून कोणताही प्रकल्प मागे जाणार नसल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी दौऱयावर आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला भाजपा राज्य महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, माजी आमदार प्रमोद जठार आदींची उपस्थिती होती. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रकल्प यावेत, यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातून येथील युवकांना रोजगार मिळायला हवा. पण मागील काळात या ठिकाणी येणाऱया अनेक प्रकल्पांवरून राजकारण करण्यात आलं आणि ते होत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. प्रकल्पांवरून फुटबॉल होतोय. पण आता या विषयावरून फुटबॉल होणार नाही. कोकणावर अन्याय होऊ देणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते सक्षम असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
यापुढे कोणीही…कितीही…आणि कुठेही विरोध केला तरी कोकणावर अन्याय होऊ देणार नाही. ज्या ठिकाणी रिफायनरी ठरेल, त्या ठिकाणी या प्रकल्पासाठी संपूर्ण ताकदीनिशी भाजपातर्फे संघटनात्मक समर्थन केले जाईल. या ठिकाणाहून कोणताही प्रकल्प आता मागे जाणार नसल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले. कोणत्याही गोष्टीसाठी असलेला जनतेचा विरोध संपवता येतो. त्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. आम्ही मोठमोठे प्रकल्प केलेत, पण शेतकऱयांचे, नागरिकांचे हित जोपासून केले. येणाऱया 50 वर्षांसाठी विकास येथे होत असेल तर काहीतरी केले पाहिजे. आता शिंदे-फडणवीस सरकार येथील जनतेला काय वाटतं, काय पाहिजे याचा विचार करत असून ते रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी चांगलेच करणार आहे. त्यात राजकीय तडजोड नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. प्रकल्पांविषयी लोकांचे गैरसमज दूर करण्यात येतील. प्रकल्पांचे फायदे किती, यावर भर देण्यात येईल. त्यामुळे आता या ठिकाणाहून प्रकल्प मागे जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
रखडलेला महामार्ग, रत्नागिरी विमानतळ प्रश्न मांडणारः बावनकुळे
कोकणची मुख्य वाहिनी असलेला सर्वांगीण विकासाचा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अजूनही तो पूर्णत्वासाठी गतीमान हालचाली नाहीत. येथील रत्नागिरी विमानतळाच्या कामाचीही गती अगदी धिम्या पद्धतीने आहे. या बाबत आपण पार्लमेंटरी बोर्डात येथील कोअर कमिटीच्या ग्रुपसोबत चर्चा करणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून कोणत्या गोष्टीसाठी हे प्रकल्प अडलेत त्यावर मार्ग काढण्यासाठी आपण निश्चित भूमिका पार पाडण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले.









