अनुसूचित जाती, जमाती संघटनांचा अखिल भारतीय परिसंघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी/कोल्हापूर
केंद्र सरकारकडून नव्याने उभारण्यात येत असलेल्या संसद भवनाच्या इमारतीला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अनुसूचित जाती, जमाती संघटनांचा अखिल भारतीय परिसंघ संघटनेचे जिल्हा व शहर प्रमुख यशवंत थोरवत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली. प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, संसद भवन हे भारतीय संविधानाला अनुसरून संसद सदस्यांचे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे कामकाज करण्याचे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. भारतीय संविधान लिहून संपूर्ण भारतीय नागरिकांना घटनात्मक हक्क, कर्तव्ये आणि जबाबदाऱया देणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय, ऐतिहासिक आहे. त्यामुळे नवीन संसद भवनाच्या इमारतीला इतर कोणापेक्षा डॉ. आंबेडकर यांचेच नाव देणे संयुक्तिक ठरेल. आमची विनंती, मागणी राज्य व केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना डॉ. प्रमोद बुलबुले, सुनील दानवे, रोहित कुरणे, भरत बोंगाळे, सविता ऱहायकर आदी उपस्थित होते.