कोयनेसह विविध प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत लवकर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याची मागणी; श्रमिक मुक्ती दलातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर व सांगली जिह्यातील कोयना, चांदोलीसह विविध प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करुन जोरदार निदर्शने करण्यात आली. कोयनेसह विविध प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घ्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यालय प्रमुख संपत देसाई व जिल्हाध्यक्ष मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली टाऊन हॉल उद्यान येथून इशारा मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये पाचशेहून अधिक प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. महिलांची उपस्थिती उल्लेखनिय होती. विविध मागण्यांच्या घोषणा देत आंदोलकांचा हा मोर्चा सीपीआर चौक, खानविलकर पेट्रोल पंपमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आला. या ठिकाणी आंदोलकांनी काही काळ निदर्शने केली. यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील मागण्या अशा, कोयना धरणग्रस्तांचे 62 वर्षांपासून प्रलंबित असलेले पुनर्वसन पूर्ण करावे, राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पात्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणार्या पर्यायी जमिनीच्या कब्जे हक्काच्या रक्कमेची परिगणना करणारा व पर्यायी जमिन वाटपाचा अन्यायी शासन निर्णय रद्द करावा.
आंदोलनात डी. के. बोडके, शंकर पाटील, संतोष गोटल, राजाराम पाटील, चैतन्य दळवी, ऍड. शरद जांभळे, हरिश्चंद्र दळवी, महेश शेलार, प्रकाश साळुंखे, सचिन कदम, नामदेव उत्तेकर, मालोजी पाटणकर, जिजाबाई दोधडे, सोनाबाई पाटील, जनाबाई झोरे आदींसह प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.