विविध ठिकाणी राबविलेल्या कारवाईवेळी 30 हजार रुपये दंड वसूल
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेने सिंगलयूज प्लॉस्टिकविरोधी मोहीम थांबविली होती. मात्र ही मोहीम सोमवारपासून पुन्हा हाती घेतली असून विविध ठिकाणी राबविलेल्या कारवाईवेळी 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्याची सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केली जाते. मात्र उत्पादकांवर कारवाई करण्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे.
सिंगलयूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याची सूचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य शासनाने केली आहे. जुलैपासून ही कारवाई राबविण्यात येत आहे. प्लास्टिक बंदीची कारवाई काटेकोरपणे राबविण्याची सूचना केली होती. मात्र शिल्लक असलेला साठा संपेपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येवू नये, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार साठा संपविण्यासाठी महापालिकेने 15 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र नोव्हेंबर संपत आला तरी विपेत्यांकडून सिंगलयूज प्लास्टिकचा साठा कसा संपत नाही, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. वास्तविक पाहता उत्पादकांवर कारवाई करण्याची सूचना केंद्रीय नियंत्रण मंडळाने स्थानिक प्रदूषण नियंत्रण विभागाला केली आहे. पण याची अंमलबजावणी विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केली जात नाही. त्यामुळे सिंगलयूज प्लास्टिकचा वापर जोरदार सुरू आहे.
गणेशोत्सवानंतर प्लास्टिक बंदीची कारवाई थांबविण्यात आली होती. त्यानंतर दसरा, दिवाळी अशा विविध सणांच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक बंदीची मोहीम थांबविण्यात आली होती. मात्र ही मोहीम सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. विविध ठिकाणी कारवाई करून 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मनपाकडून नाममात्र कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिकचे उत्पादन करणाऱया कंपन्यांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच शहरात प्लास्टिकचा वापर सुरू आहे. सिंगलयूज प्लास्टिक उत्पादकांना कोण आवरणार? असा मुद्दा उपस्थित होत आहे. प्लास्टिकच्या उत्पादनावर बंधने लादल्यासच प्रदूषणावर नियंत्रण येण्याची शक्मयता आहे.









