ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. समितीतील सर्वपक्षीय सदस्यांची या बैठकीला उपस्थिती होती. यावेळी हा प्रश्न सोडवण्यासाठी रणनीती आखण्यात येण्यावर चर्चा झाली. त्यानुसार मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या बैठकीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रमुख मंत्र्यांची उपस्थिती होती. याशिवाय शरद पवार, नारायण राणे, अजित पवार यांचीही या बैठकीस उपस्थिती राहणार होती, मात्र काही कारणास्तव ते बैठकीस पोहचू शकले नसल्याची माहिती समोर आली आहे.
न्यायालयात सीमा भागातील प्रश्नांसंदर्भात कशाप्रकारे बाजू मांडायची या संदर्भात प्रामुख्याने या बैठकीत चर्चा झाली. या दोन्ही मंत्र्यांनी सीमावर्ती भाग म्हणजेच खासकरून बेळगाव आणि कर्नाटक सीमेशी लगत असलेल्या महाराष्ट्राच्या भागातील प्रश्न सोडवणे, तेथील लोकांच्या मागण्या समजून घेणे अपेक्षित आहे.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ आगामी काळात भेटाव यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व खासदारांनीही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटून सीमावर्ती भागात जिथे मराठी भाषिक राहतात, तो भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
यापूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एकदा महाराष्ट्राचं शिष्टमंडळ याप्रकरणी त्यांना भेटलं होतं. पण त्यानंतर आत्तापर्यंत कधीही महाराष्ट्राचं शिष्टमंडळ केंद्रीतील पंतप्रधानांना किंवा गृहमंत्र्यांना भेटलेलं नाही. त्यामुळं यासंदर्भात उच्चाधिकार समिती किंवा महाराष्ट्रातील शिष्टमंडळ तयार करुन पंतप्रधानांची भेट घेतली पाहिजे, अशी मागणी मी मांडली, ती मान्य झाली आहे.