शहर-उपनगरातील रस्त्यावर साचताहेत कचऱयाचे ढीग : कचरा साचून दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारीत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल करण्यासाठी वर्षाला 20 कोटीहून अधिक निधी खर्च केला जातो. मात्र रस्त्याशेजारी कचरा साचण्याचे प्रकार जैसेथे आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरातील रस्त्याशेजारी कचरा साचून दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेच्या अधिकाऱयांचे नियंत्रण नसल्यानेच शहराच्या जागो जागी अस्वच्छता निर्माण होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि दुभाजकावर पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र स्वच्छतेबाबत आवश्यक उपाय योजना राबविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. केवळ रस्त्यांचा विकास केला की, स्मार्ट सिटी बनली का? असा मुद्दा उपस्थित होत आहे. कचऱयाची उचल करण्यापासून कचरा डेपोपर्यंत नेण्यासाठी वर्षाला 20 कोटीहून अधिक निधी खर्च केला जातो. शहराच्या स्वच्छतेसाठी 1100 खासगी स्वच्छता कामगार आणि महापालिकेचे 150 हून अधिक कर्मचारी दररोज कार्यरत असतात. तरी देखील रस्त्या शेजारी कचरा साचतो कसा? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते असे सांगण्यात येते. काही भागात याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे केली जाते मात्र काही भागात कचरा वाहू वाहने येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. घरात किती दिवस कचरा ठेवणार असा मुद्दा उपस्थित होत असल्याने नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत आहेत. मात्र केवळ नागरिकांना दोषी ठरविले जाते. जर कचरावाहू वाहने नियमितपणे येवून कचरा जमा केल्यास ही समस्या निर्माण होणार नाही. पण महापालिकेकडूनच कचऱयाची उचल वेळेवर केली जात नसल्याने रस्त्या शेजारी कचरा साचत असल्याचे निदर्शनास येत आहे.
स्वच्छतेकडे अधिकाऱयांचा कानाडोळा
महापालिकेतील सर्वच अधिकारी स्वच्छतेकडे कानाडोळा करीत आहेत. अपुऱया कर्मचाऱयांमुळे स्वच्छतेची कामे व्यवस्थित केली जात नाहीत. 1100 हंगामी स्वच्छता कामगारांपैकी केवळ 800 कामगार प्रत्यक्षात काम करीत असतात.
उर्वरित 300 कामगार केवळ हजेरी भरण्यापुरतेच असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचे वेळेवर आणि व्यवस्थित होत नाही. मनपाच्या अधिकाऱयांनी विविध भागात जावून पाहणी करणे आवश्यक आहे पण सुपरवायझर आणि मुकादमांवर स्वच्छतेची जबाबदारी देवून स्वच्छता निरीक्षक आपल्या अन्य कामात व्यस्त असतात. त्यामुळेच कोटय़वधी निधी खर्च करूनही शहर स्मार्ट बनत नसल्याच्या प्रतिक्रिया शहरवासीय व्यक्त करीत आहेत. शहराच्या स्वच्छतेसाठी मनपा प्रशासनाकडूनच नियमावलीचे पालन होणे आवश्यक आहे.
स्वच्छता कंत्राट म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण
काही भागात दररोज कचरावाहू वाहने येतात तर काही भागात 3 ते 4 दिवसाआड वाहने कचरा घेण्यासाठी येतात. त्यामुळे नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्मकचरा साचून दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी वाढार्ट सिटीमधील कचराकुंडय़ा हद्दपार करण्यासाठी महापालिकेकडून कोटय़वधी निधी खर्च केला जातो. तरी देखील रस्त्या शेजारी कचऱयाचे ढिगारे जैसे थे आहेत. अशामुळे स्मार्ट सिटी कशी बनणार अशी विचारणा नागरिक करीत आहेत. स्वच्छता कंत्राट म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.









