वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
19 वर्षाखालील वयोगटाच्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मायदेशात होणाऱया न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी श्वेता सेरावतकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. न्यूझीलंडचा 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघ 27 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान भारताच्या दौऱयावर येणार असून या दौऱयामध्ये 5 सामन्यांची मालिका आयोजित केली आहे.
14 ते 29 जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱया 19 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सराव व्हावा या हेतूने बीसीसीआयने हा दौरा आयोजित केला आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईत खेळविले जाणार आहेत. या मालिकेपूर्वी न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यातील टी-20 चे दोन सामने मुंबईत 22 आणि 24 नोव्हेंबरला होणार आहेत.
भारतीय महिला संघ-श्वेता सेरावत (कर्णधार), शिखा शेलोत, जी. त्रिशा, सौम्या तिवारी (उपकर्णधार), सोनिया मेहदीया, हर्ले गाला, एच. बसू, नंदिनी काश्यप, सोनम यादव, मनात काश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, टिटास साधू, फलक नाझ आणि शबनम एम. डी.









