वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिको
येथे सुरू असलेल्या मेलवॉटर चॅम्पियन्स टूर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन इरीगेसीने व्हिएतनामचा ग्रँडमास्टर क्युयांग लीचा जलद प्रकारात पराभव केला. तर टॉपसिडेड मॅग्नस कार्लसनने भारताच्या प्रज्ञानंदवर मात केली.
इरीगेसीने क्युयांग लीचा 2.5-0.5 अशा गुणांनी पराभव करत सहाव्या फेरीअखेर गुणतक्त्यात चौथे स्थान मिळवले. तर टॉपसिडेड बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने 17 वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचा 2.5-0.5 अशा गुणांनी पराभव केला. नॉर्वेचा ग्रँडमास्टर कार्लसनने सहाव्या फेरीअखेर गुणतक्त्यात 17 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. कार्लसनने आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 5 गुण अधिक मिळवले आहेत. आता या स्पर्धेतील सातवी आणि शेवटची फेरी बाकी आहे. सहाव्या फेरीतील अन्य एका पटावरील सामन्यात अमेरिकेच्या वेस्ले सोने पोलंडचा ग्रँडमास्टर डुडाचा 3-0 असा पराभव करत गुणतक्त्यात 12 गुणासह दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. इरीगेसीने 9 गुणासह चौथे स्थान मिळविले आहे. अजरबेजानच्या मॅमेडेरोव्हाने हॉलंडच्या अनिष गिरीवर 2.5-0.5 अशी मात केली. गुणतक्त्यात मॅमेडेरोव्ह सहाव्या तर गिरी 8 व्या स्थानावर आहे. 19 वर्षीय इरीगेसीने पहिल्या डावात काळय़ा मोहरा घेऊन खेळताना व्हिएतनामच्या क्युयांग लीचा 66 व्या चालीत पराभव केला. तर दुसऱया लढतीत इरीगेसीने क्युयांगवर 46 व्या चालीत मात केली. उभयतामधील तिसरा डाव 24 व्या चालीनंतर बरोबरीत राहिला. या स्पर्धेत विजेत्यांसाठी एकूण 210,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले असून राऊंड रॉबिनमधील प्रत्येक डाव जिंकणाऱया स्पर्धकाला 7500 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जात आहे. या स्पर्धेत सर्वाधिक डाव जिंकणाऱया बुद्धिबळपटूला विजेता म्हणून घोषित करण्यात येणार असून त्याला सर्वाधिक कमाल बक्षीसाची रक्कम दिली जाईल.









