कुठलाच धर्म वाईट नसतो अशी केली टिप्पणी
वृत्तसंस्था /अखनूर
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी भगवान रामासंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. भगवान राम हे सर्वांचे आहेत. राम हे केवळ हिंदू धर्माच्या लोकांसाठी नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
कुठलाच धर्म वाईट नसतो. माणसांचे वर्तन चुकीचे असते. भाजप निवडणुकीदरम्यान ‘हिंदू खतरे में है’ नाऱयाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करेल, परंतु लोकांनी या खोटय़ा दाव्याला बळी पडू नये असे आवाहन करत असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 50 हजार नोकऱयांचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाचे काय झाले? आमचे डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि आमचे तरुण-तरुणी बेरोजगार आहेत. केवळ राज्यपालांकडून प्रशासन चालविले जाऊ शकते. येथे निवडणूक करविणे आवश्यक असल्याचे अब्दुल्ला म्हणाले.
1947 मध्ये काश्मीरवर टोळीवाल्यांनी हल्ला केल्यावर बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांनी माझे वडिल शेख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीर पाकिस्तानात विलीन करण्यास सांगितले होते. परंतु शेख अब्दुल्ला यांनी याला स्पष्ट नकार देत भारताच निवड केली. भारताची निवड त्यांनी केल्याने आम्ही आनंदी आहोत. कारण, सद्यकाळात पाकिस्तानात स्थिती अत्यंत खराब आहे. तेथील माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळय़ा झाडण्यात आल्या. जनतेऐवजी सैन्याच्या हातात तेथे सत्ता एकवटली आहे. तर भारतात सर्वसामान्यांच्या हातात शक्ती असल्याचे अब्दुल्ला म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाहीवादी सरकार नाही. यामुळे लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. येथे लवकरच निवडणूक होऊन लोकांना त्यांचे प्रतिनिधी मिळायला हवेत. जम्मू-काश्मीरला राज्याचा देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.









